महामंडळाकडून मानहानीकारक वागणूक मिळाल्याने राग अनावर झालेल्या एस. टी. बसचालक केरबा नरवटे यांनी विभाग नियंत्रक कार्यालयात दोन अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला. या प्रकारामुळे कार्यालयात खळबळ उडाली. बसचालकास अटक करण्यात आली.
लातूर तालुक्यातील भातखेडा येथे चालक केरबा नरवटे यांच्याकडून १७ डिसेंबरला अपघात घडला. त्यामुळे त्यांना विभाग नियंत्रक कार्यालयात प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, महामंडळाकडून आपल्याला मानहानीकारक वागणूक दिली जात असल्याचा समज करून घेत राग अनावर झाल्याने नरवटे यांनी गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास दारूच्या नशेत दोन अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला. यात एकाच्या हाताला दुखापत झाली. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले.
हल्ल्यातील जखमी व्ही. व्ही. भंडे यांच्या तक्रारीवरून नरवटे यांना अटक करण्यात आली. विभाग नियंत्रक डी. बी. माने यांच्यावरच हल्ला करण्याच्या हेतूने नरवटे कार्यालयात आलेले होते. मात्र, त्यांच्या कक्षातील गर्दी पाहून इतर २ अधिकाऱ्यांवर त्यांनी हल्ला केल्याची चर्चा आहे.