लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात केवळ व्यापारी असोसिएशनच्या सभासदांनाच लिलावात सहभागी होण्याची परवानगी असावी, या आग्रही मागणीसाठी लासलगाव र्मचट्स असोसिएशनने तीन दिवसांपासून बंद ठेवलेले लिलाव शुक्रवारपासून सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मुंबई येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व व्यापारी यांची बैठक झाली. या वेळी वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आधी लिलाव सुरू करावेत, अशी सूचना भुजबळ यांनी केली. त्यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून लिलाव सुरू करण्याचे मान्य केले. दरम्यान, बाजार समितीने १८० व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कारवाईच्या भीतीमुळे व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतले. या घडामोडीत तीन दिवस कांदा व इतर शेतमालाचे व्यवहार होऊ शकले नाहीत. कोटय़वधी रुपयांची उलाढाल ठप्प होऊन व्यापाऱ्यांच्या वादात नाहक शेतकरी भरडला गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद राहिल्याने कांदा व इतर शेतमालाचे व्यवहार ठप्प झाल्यावर निफाडच्या साहाय्यक निबंधक कार्यालयात बैठक झाली होती. पण त्यातून तोडगा निघाला नाही. लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात मर्चन्ट असोसिएशन संघटनेचे सभासद नसलेला व्यापारी धान्य लिलावात सहभागी झाल्यामुळे इतर सभासदांनी त्यास विरोध दर्शविला. बाहेरील व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी करू नये, असे लेखी पत्र असोसिएशनने दिले. पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने र्मचट असोसिएशनच्या सभासदांची पुन्हा बैठक झाली. बाहेरील व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होऊ द्यायचे की नाही, या मुद्दय़ावरून सभासदांमध्ये दुफळी निर्माण झाली. व्यापाऱ्यांमध्ये मतभेद झाल्यामुळे लिलाव सुरू करावे की नाही, याबद्दल निर्णय होऊ शकला नाही.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अखेर सात जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडे निर्णयाचे सर्वाधिकार सोपविण्यात आले. दरम्यानच्या काळात बाजार समितीने लिलाव बंद केल्यावरून व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.व्यापारी संघटनेच्या समितीने गुरुवारी मुंबईत माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी ७० व्यापारीही उपस्थित होते. लिलाव ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
यामुळे वादाचे मुद्दे बाजूला ठेवून आधी लिलाव सुरू करावे, असे भुजबळ यांनी सूचित केले. या आवाहनास व्यापारी असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारपासून लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू केले जाणार असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बाजार समितीने नोटीस बजावल्याने कारवाईच्या भीतीपोटी व्यापाऱ्यांना हा निर्णय घेण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.