जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘ऑडिओग्राम’ यंत्रणा महिनाभरानंतर दुरुस्त झाली असली तरी शहरातील कर्णबधिर विद्यार्थ्यांमध्ये बहिरत्वाचे व्यंग किती, याची विशेष चाचणी करण्यासाठी मुंबईला फेऱ्या माराव्या लागत आहेत. संबंधित शाळांनी पाठपुरावा केल्यामुळे बंद पडलेली यंत्रणा काही दिवसांपूर्वी सुरू झाली. मात्र, अद्याप काही चाचण्या खासगी अथवा मुंबई येथील सरकारी संस्थांमधून कराव्या लागत असल्याने पालकांना नाहक भरुदड सोसावा लागत आहे.
शहर परिसरात कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या एकूण नऊ शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांना श्रवणचाचणी अनिवार्य आहे. या चाचणीद्वारे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये किती टक्के कर्णबधिरत्व आहे याचा आलेख मिळतो. त्यानुसार पुढील उपचार सुरू होतात तसेच त्याला जिल्हा शल्य चिकित्सकांकडून कर्णबधिरत्वाचा दाखला मिळतो. विशेष मुलांना सर्व शिक्षा अभियानाचा लाभ मिळवून देण्याबरोबर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण ठरते. याशिवाय विविध शासकीय परीक्षांमध्ये श्रवणचाचणीच्या माध्यमातून स्पर्धकांची कर्णक्षमतेची चाचपणी या माध्यमातून केली जाते. मात्र जून महिन्यात शासकीय रुग्णालयातील यंत्रात बिघाड झाल्याने हजाराहून अधिक विद्यार्थी आणि प्रौढ कर्णबधिर यांच्या ‘श्रवण चाचणी’चा प्रश्न उभा राहिला. याबाबत शाळांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधला असता, ही यंत्रणा नादुरुस्त असून ती कधी सुरळीत होईल याबाबत साशंकता व्यक्त करीत गरजूंनी खासगी किंवा मुंबई येथील ब्रांदास्थित संस्थेत चाचणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. वास्तविक, विद्यार्थ्यांची संख्या, त्यासाठी मुंबईला जाण्या-येण्याचा खर्च पालकांना परवडणारा नाही. यामुळे संबंधित संस्थांनी तेथील काही तज्ज्ञांना स्वखर्चाने या ठिकाणी श्रवणचाचणीसाठी पाचारण केले. दरम्यान, काही रुग्णांना डॉक्टर नाही, उद्या या, काहींना यंत्रात बिघाड आहे, असे सांगत बोळवण करण्यात येत आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित यंत्र बंद होते ही बाब मान्य करून ते जुलै महिन्यात दुरुस्त करण्यात आल्याचे सांगितले. या यंत्राच्या माध्यमातून नियमित श्रवणचाचणी सुरू आहे. मात्र ‘बेरा टेस्ट’सारख्या काही चाचण्या खासगी किंवा मुंबई येथील सरकारी दवाखान्यातून कराव्या लागत आहेत, असे त्यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा रुग्णालयाने विस्तारीकरण तसेच आधुनिकतेचा घाट घातला असताना रुग्णालयात मूलभूत सोयी-सुविधांची वानवा असल्याचे या घटनेने उघड केले आहे. रुग्णालयातील काही यंत्रे बंद अवस्थेत आहे, काही चाचण्या व औषधे रुग्णांना बाहेरून आणावे लागतात.