ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये चालू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात भारत प्राथमिक फेरी तरी पार करेल का, असा प्रश्न उपस्थित होत असताना सर्वाचा होरा चुकवून भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सुरुवातीपासूनच जगज्जेत्यांच्या थाटात खेळणाऱ्या भारताच्या या कामगिरीचा थेट परिणाम सध्या भारत-ऑस्ट्रेलिया या दरम्यान हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर होत आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांदरम्यानचा विमानप्रवास तब्बल २० टक्क्यांनी महागला आहे. आठवडाभरापूर्वी या प्रवासाची तिकिटे ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होती. मात्र सध्या या तिकिटांसाठी ६० ते ७० हजार रुपये मोजावे लागत आहेत.
भारताने विश्वचषकातील एकूण एक सामना जिंकत ऑस्ट्रेलियात मैदान गाजवले आहे. समोरील प्रत्येक संघाच्या सर्वच्या सर्व फलंदाजांना बाद करण्याची किमया करणारा हा संघ आता उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अनेकांनी भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना पाहण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियात जाण्याची तयारी चालवली आहे. हा सामना जिंकून भारत अंतिम फेरी गाठणार, अशी खात्री असलेल्या अनेकांनी अंतिम फेरीसाठीही मोर्चे बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीचे गणित विमान तिकिटांच्या वाढलेल्या किमतीमुळे कोसळले आहे.
गेल्या आठवडय़ापर्यंत भारतातील चार महत्त्वाच्या शहरांमधून ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमान तिकिटांची किंमत ५० हजार रुपयांच्या आतच होती. मात्र सध्या सर्वच संकेतस्थळांवर विविध विमान कंपन्या या प्रवासासाठी ६० ते ७० हजार रुपये आकारत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास या तिकीट दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.