दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील लघुसिंचन तलावावर प्रायोगिक तत्वावर समन्याय वाटप तत्वानुसार कार्यान्वित करण्यात आलेल्या उपसा सिंचन योजना प्रकल्पास अधिकाऱ्यांनी भेट देऊन  सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेल्या सुधारणा व त्याचे दृश्य परिणाम याबाबत चर्चा केली.
इंदोरे येथील लघुसिंचन तलावावर २००४-०५ मध्ये प्रायोगिक तत्वावर समन्याय वाटप तत्वावर आधारित उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. जय मल्हार पाणी वापर संस्थेमार्फत ही योजना राबविण्यात येत असून ११५ शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. २०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. मागील सात-आठ वर्षांत तलाव पूर्ण क्षमतेने भरला नसतानाही सिंचन क्षमतेच्या दीडपट क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली आले असून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न २५ हजार वरून १.८१ लाख इतके वाढले आहे.
या योजनेचा नाशिक विभागातील स्तुत्य उपक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून याच धर्तीवर नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात समन्याय वाटप तत्वावर उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी इंदोरे येथील जय मल्हार उपसा सिंचन योजनेची पाहणी केली.सर्व कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांनी या योजनेस भेट देऊन तांत्रिक बाबीची तपशीलवार माहिती घेतली.
तसेच शेतकऱ्यांशी भेट गेऊन योजनेची उपयुक्तता व योजनेमुळे व सिंचन सुविधेमुळे शेतीमध्ये केलेल्या सुधारणा व त्याचे दृश्य परिमाम याबाबत चर्चा केली. क्षेत्रीय भेटीसाठी उपस्थित
सर्व अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त एकनाथ डवले व अधीक्षक अभियंता मोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.