नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने उभारलेली प्रवासी बसस्थानके सध्या रिक्षाचालकांच्या पार्किंगच्या गर्दीत सापडली आहेत. प्रवासी बसस्थानकावर उभे असतानादेखील मुजोर रिक्षाचालक चक्क बसस्थानकांच्या दोन्ही बाजूला बेधडकपणे रिक्षा पार्किंग करतात. रिक्षांच्या गर्दीतून बसप्रवाशांना वाट शोधत बस पकडावी लागत आहे.
परिवहन सेवेने प्रवाशांकरिता लाखो रुपये खर्च करून बसस्टॉप उभारली आहेत. बस स्थानकानजीकच असणाऱ्या गॅरेजमुळे आणि विनापरवाना रिक्षा पार्किंग करण्यात येत असल्याने प्रवाशांना अडचण ठरत आहे.
दिद्या साठे नगर येथील बस स्टॉपनजीक गॅरेजच्या मुळे या ठिकाणी दिवसाढवळ्यादेखील रिक्षांचा वेढा बसस्टॉपला असतो.
तुभ्रे नाका येथील ठाण्याच्या दिशेने असणाऱ्या बसस्टॉपनजीक खासगी गाडय़ांची पार्किंग आणि मालवाहक गाडय़ांची पार्किंग करण्यात येत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. हीच परिस्थिती जुईगाव बसस्टॉप, सानपाडा रेल्वे स्टेशननजीकच्या बसस्टॉपची आहे. अनेकदा नागरिकांनी परिवहन आणि वाहतूक पोलिसांना यांची माहितीदेखील दिली आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. एनएमएमटीच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी केवळ परिवहनचे बसस्टॉप उभारण्याचे काम असून रिक्षाचालकाकडून होणारी पार्किंग हा प्रश्न वाहतूक शाखेच्या अंतर्गत असल्याचे सांगत टोलवाटोलवी केली जात आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी मात्र ठाणे बेलापूर मार्गावरील येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ांची तपासणी दरदिवशी करतात. परंतु प्रवाशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा आणि रिक्षाचालकांच्या मनमानीपणामुळे होणाऱ्या त्रासाची सोडवणूक करण्यासाठी पुढे सरसावत नसल्याची ओरड महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.  

बस स्टॉपजवळ रिक्षाचालक रिक्षा उभी करतात. विशेषत: सकाळच्या वेळेला कामासाठी जाणाऱ्या महिलांना त्रास होतो. त्यातच रिक्षाचालकांची टवाळेगिरीदेखील चिडीचूपपणे आम्हाला सहन करावी लागते. पोलिसांनी बसस्टॉप रिक्षा पार्किंगपासून मुक्त केले पाहिजे.
– स्नेहल रोडे, प्रवासी