मीटरनुसार ऑटो रिक्षा चालाव्यात, यासाठी पोलीस व परिवहन खात्याने सोमवारी संयुक्त तपासणी हाती घेतल्याने अवैध वाहन चालक धास्तावले. ऑटो रिक्षासह अनेक वाहने रस्त्यावर दिसलीच नाहीत.
परिवहन प्राधीकरणाने १ सप्टेंबरपासून ऑटोरिक्षाचे प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये भाडे निश्चित केले. शेअर तसेच प्रिपेड ऑटोरिक्षासाठीसुद्धा हा दर लागू राहणार आहे. रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत मंजूर भाडय़ाच्या २५ टक्के अतिरिक्त भाडे द्यावे लागेल. ६० बाय ४० सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त आकाराच्या नगासाठी (सामान) तीन रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी प्राधीकरणाने ऑटोरिक्षा चालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. या १५ दिवसात त्याला जुन्या म्हणजे (१ जुलै २०१२ पासून ते ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंतचे) दराने भाडे आकारता येईल. त्यानुसार आजपासून परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी शहरात संयुक्त तपासणी मोहीम सुरू केली. मीटरप्रमाणे न चालणे, सदोष मीटरचा वापर करणे, मीटरचे सील तुटलेले असतानाही वापरणे, खोटे दर पत्रक वाहनात ठेवणे व आकारणे, नव्या भाडेपत्रकापेक्षा जास्त भाडे घेणे, ते ऑटोरिक्षात न ठेवणे आदींसाठी सुधारित दंड आकारणी केली गेली. पहिल्या गुन्ह्य़ात दहा दिवस परवाना निलंबन किंवा दोन हजार रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्य़ास पंधरा दिवस परवाना निलंबन किंवा अडीच हजार रुपये दंड, तिसऱ्या गुन्ह्य़ास तीस दिवस परवाना निलंबन किंवा तीन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. परिवहन खात्याने आज ७७ वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी ४५ वाहने ताब्यात घेण्यात आली. ९० हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले. दोन मोर्चे परिवहन कार्यालयावर गेले होते. कारवाई थांबवा, सवलत द्या, आदी मागण्या होत्या. आधी मीटरने वाहने चालवा, असे त्यांना सांगण्यात आले.
ऑटो रिक्षा व अवैध वाहनांची तपासणी सुरू होताच ऑटो रिक्षासह अवैध प्रवासी वाहतूक करणारे गायब झाले. शहरात १० हजार ६५२ परवानाप्राप्त ऑटो रिक्षा आहेत. आज अत्यंत कमी रिक्षे रस्त्यावर धावताना दिसले. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी ऑटो रिक्षा चालकांनी मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी धाव घेतली. शहरात गड्डीगोदाममधील पाटणी ऑटोमोबाईल्स व मेडिकल चौकाजवळ अशा केवळ दोनच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने तेथे गर्दी झाली होती. मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी केवळ दोनशे व त्यानंतर मीटर सील करण्यासाठी साठ, असे एकूण २६० रुपये तसेच मीटरचे कॅलिब्रेशन योग्य झाले का नाही, याची तपासणी अंजुमन आयटीआयमध्ये करण्यासाठी ६५ रुपये द्यावे लागणार आहेत.
दरम्यान, ऑटोरिक्षा चालकांनी मीटरनुसार आणि नव्या दरानुसार भाडे आकारणी करावी, मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी केवळ मीटर न्यावे, कॅलिब्रेशनची तपासणी केल्यानंतरच ऑटोरिक्षा नेऊन सील करून घ्यावे, असे आवाहन विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे प्रमुख विलास भालेकर यांनी केले आहे. पोलीस व परिवहन खात्याने अवैध वाहतुकीवर बंदी आणावी व केवळ ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करू नये, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.