सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून ऑटोरिक्षाच्या रचनेमध्ये बदल करून चालकांनी प्रवाशांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. चालक आणि तीन प्रवाशी बसू शकतील अशी ऑटोरिक्षाची रचना असते. परंतु अधिक प्रवासी बसविणे शक्य व्हावे म्हणून वाहनाच्या मूळ रचनेमध्ये बदल केला जात आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा वाहनांना योग्य ठरवित आहेत.
शहरात वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या पेट्रोल ऑटोरिक्षा चालकांना एकावेळी तीन प्रवासी घेण्याचा परवाना आहे. मात्र आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून शहरात व्यवसाय सुरू आहे. १६ वर्षे झालेल्या ऑटोरिक्षा बाद करण्यात आल्या आहेत. त्या ऑटोरिक्षा भंगार करून, त्याच परवान्यावर नवीन ऑटोरिक्षा खरेदी करण्याचा सरकारने आदेश काढला आहे. शहरात जवळपास सर्व जुन्या ऑटोरिक्षा बाद झालेल्या आहेत. ऑटोरिक्षा चालकांनी जुन्या ऑटोरिक्षाऐवजी नवीन ऑटोरिक्षा कर्जावर खरेदी केल्या आहेत. या ऑटोरिक्षाची परतफेड व्याजासोबत ऑटोरिक्षा चालकांना करायची आहे. असे असताना अनेक ऑटोरिक्षा चालकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करण्यापेक्षा वाहनात परिवर्तन करून आसनक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ऑटोरिक्षा चालकांना अधिक प्रवाशांना बसवून आर्थिक लाभ मिळू शकेल, परंतु ऑटोरिक्षाची क्षमता, त्याची रचना बदलण्यात आल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. शिवाय अधिक प्रवासी बसविल्याने ऑटोरिक्षाची आयुष्य कमी होते. विशेष म्हणजे नवीन ऑटोरिक्षांच्या मूळ डिझाईनमध्ये बदल झाल्याचे दिसून येत असताना आर.टी.ओ.कडून पासिंग मिळत आहे. काही ऑटोचालक पासिंग झाल्यावर रचनेमध्ये परिवर्तन करतात. परंतु एक किंवा दोन वर्षांनी मंजुरीला ते वाहन जात असते. तेव्हा तरी आर.टी.ओने त्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या २०१२-१३ पासून अद्याप अशा प्रकारे कोणत्याही ऑटोरिक्षावर बंदी घालण्यात आली नाही.
वाहनांमध्ये बदल केल्यामुळे तीनपेक्षा जास्त प्रवासी बसविण्याकरिता पुरेशी जागा मिळते. या अवैध प्रकारावर आळा बसविण्याकरिता आर.टी.ओ. कार्यालयात  ऑटोरिक्षा आल्यास अशा ऑटोरिक्षांना दंडीत करणे आवश्यक आहे. जो पर्यंत शासन नियमाप्रमाणे ऑटोरिक्षा नीट करून आणत नाही, तोपर्यंत त्यांची ऑटोरिक्षा पासिंग केले जायला नको. अन्यथा थोडय़ा लाभापोटी ऑटोरिक्षा चालकांना ऑटोरिक्षामध्ये बदल करीत राहणार आहेत, असे नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघाचे सरचिटणीस हरिशचंद्र पवार म्हणाले.
यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. परंतु अद्याप कोणतेही पावले उचलण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

असे बदल करण्यात येतात..
-चालकाच्या आसनामागचा दांडा सरळ करून प्रवासी बसविण्याची जागा वाढवून घेतली जाते.
–  ऑटोरिक्षाचा चेसीस सहा इंच वाढवून आसन क्षमता वाढवून घेतली जाते.  
–  ऑटोच्या आसनात परिवर्तन करून वाढवून घेतले जाते.
–  ऑटोरिक्षांची उंची वाढवून घेतली जाते.

केवळ औपचारिकता
मूळ रचनेमध्ये बदल असलेल्या वाहनांची पासिंग प्रादेशिक परिवहन अधिकारी करीत आहेत. आर.टी.ओ.कडून योग्यप्रकारे तपासणी होत नाही. केवळ औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
-हरिशचंद्र पवार, सरचिटणीस,
नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघ