येथील शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून अंगावर घासलेट ओतुन पेटवून घेणाऱ्या रिक्षाचालकाचे उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे निधन झाले. या प्रकरणी वाहतूक पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सुरेश कोते (२७) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल छगन चिंधू भगरे यांच्या जाचाला कंटाळून सुरेशने अंगावर घासलेट ओतून पेटवून घेतल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. रिक्षाचालक कोते याच्या मृत्यूची माहिती समजताच नातेवाईक व रिक्षाचालकांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. कोते याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहतूक पोलिसावर कठोर कारवाई करून निलंबीत करण्याची मागणी केली. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यास घेण्यास त्यांनी नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे पोलीस उपअधीक्षक महेश सवई यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी सुनील चांगरे, नगरसेवक तानाजी देशमुख आदींनी नातेवाईकांची समजूत घातली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसाविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भगरे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मयत कोते यांचा भाऊ सागर कोतेने याबाबत तक्रार दिली. वाहतूक पोलीस भगरे यांनी ८ मे रोजी सुरेश कोते त्याची रिक्षा नवीन बस स्थानकाकडून प्रवासी सोडून मोसम पुलाकडे येत असतांना त्याला थांबविले. रिक्षाच्या कागदपत्रांची मागणी केली. त्याची रिक्षा वाहतूक पोलीस कार्यालयात नेण्यात आली. त्यानंतर सुरेशने कागदपत्र आणून दाखविले. तरी भगरे यांनी दंडात्मक कारवाई केल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. त्यातच, घरी आल्यावर रात्री साडे अकराच्या सुमारास स्वतच्या अंगावर घासलेट ओतून पेटवून घेतले. गंभीर जखमी झालेल्या सुरेश कोते यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.