कुणी तरी आपल्याला फसवत होता परंतु आपण चातुर्याने स्वत:चा बचाव केला तर आपण आपल्यावरच खूश होतो, परंतु काही जण तेवढय़ावर समाधान न मानता ज्याने फसवले त्याच्या मागे लागतात. त्याला पकडण्याचा, किमानपक्षी त्याने इतरांना फसवू नये यासाठी ‘जागल्या’चे व्रत घेतात. गोरेगावमधील उदय चितळे यांनी असेच जागल्याचे व्रत पाळले आहे.
व्यवसायाने मेकॅनिकल अभियंता असलेले चितळे यांना काही दिवसांपूर्वी ‘टाटा मोटर्स’च्या लेटरहेडवर एक ई-मेल आला. त्यात ‘टाटा’मध्ये नोकरीची संधी असून त्यासाठी आपला ‘सीव्ही’, फोटो पाठवण्याचे आवाहन केले होते. तसेच ‘अनामत रक्कम’ म्हणून ९,३०० रुपये ‘बँक ऑफ इंडिया’च्या खात्यात जमा करण्यास सांगितले होते. मेलपाठोपाठ त्यांना वीरेंदरसिंग नावाच्या माणसाचा दूरध्वनीही आला आणि त्याने खात्यात पैसे भरले की ती पावती स्कॅन करून मेलवर पाठवण्यास सांगितले. या सगळ्याचा चितळे यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने ‘टाटा मोटर्स’शी संपर्क साधला. तेथे त्यांना आमच्याकडे अशी काही भरती सुरू नसल्याचे सांगण्यात आले. मग या संदर्भात ‘तुम्ही काही कारवाई करा,’ असे त्यांनी सुचवल्यावर ‘आम्ही आमच्या विधी विभागाचा सल्ला घेऊ,’ असे सांगण्यात आले.
त्यानंतर चितळे यांनी ‘बँक ऑफ इंडिया’तील आपल्या एका परिचिताशी संपर्क साधून त्यांना सदर खात्याची चौकशी करण्याची विनंती केली. या परिचितांनी त्याप्रमाणे तातडीने हालचाली केल्या असता हा खातेक्रमांक बँकेच्या गाझियाबाद शाखेतील असल्याचे आढळून आले. या खात्यात त्या क्षणी अवघे ९४ रुपये असल्याचे तसेच त्यात पैसे भरले गेल्यावर लगेच ते काढले जात असल्याचे आढळून आले. अधिक चौकशीअंती या खात्यासाठी देण्यात आलेला ‘केवायसी’ अर्जही खोटा असल्याचे आढळून आले. बँकेने लागलीच हे खाते बंद केले.
दुपापर्यंत ही कारवाई झाल्यावर चितळे यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाशी संपर्क साधला. मात्र आमच्याकडे ३ कोटीहून अधिक रकमेचेच गुन्हे हाताळले जातात, असे त्यांना सांगण्यात आले. मग त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला संपर्क केला. तेथून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. तेथे त्यांनी आपली तक्रार नोंदवली.
पण चितळे तेवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांनी इंटरनेटवर गाझियाबादच्या पोलीस अधीक्षकांचा दूरध्वनी शोधून काढला. तेथून बँक ज्या भागात होती त्या जयनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांना ठंडाच प्रतिसाद लाभला. यापुढे आणखी काही करणे त्यांना शक्य नव्हते. मात्र एखादा समाजहितैषी व्यक्तिगत पातळीवर जे काही कमाल प्रयत्न करू शकतो तेवढे त्यांनी केले.‘मी वाचलो. परंतु अनेक गरजूंची अशी फसवणूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी शक्य ते सारे काही करावे, या विचाराने मी हा उपद्व्याप केला,’ असे चितळे सांगतात.
चितळे आता विविध वृत्तपत्रांतून येणाऱ्या अशा ‘संभाव्य फसव्या’ जाहिरातींवर नजर ठेवून असतात. संशय आला की दूरध्वनी करून चौकशी करतात. अशा जाहिरातींद्वारे फसवणूक करणाऱ्यांचा ‘धंदा’ बंद करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.
चितळे यांची प्रतिमा ‘तक्रारखोर’ अशी आहे. आरटीओ, महापालिका, राज्य सरकार आदी आस्थापनांमध्ये त्यांचा जणू दराराच आहे. एखाद्या नियमबाह्य़ बाबीची नुसती तक्रार करून ते थांबत नाहीत तर ती तडीला जाईपर्यंत तिचा पाठपुरावाही करतात. मुंबई ग्राहक पंचायतीत ‘ग्राहक सल्लागार’ म्हणून केलेल्या कामाचा आपल्याला खूप फायदा होतो, अशी प्रांजळ कबुली ते देतात.