राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणारा बी.कॉम. प्रथम वर्षांचा प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे फुटलेला पेपर आता सहा मे रोजी घेण्यात येणार आहे.
सोमवारी उत्तर नागपुरातील दयानंद आर्य कन्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर अज्ञानापोटी बी.कॉम प्रथम वर्षांचा हिंदी विषयाचा पेपर एक दिवस अगोदरच वाटण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेले पेपर परत घेण्यात आले. आता हा पेपर सहा मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून मिळाली आहे. अगोदरच दोनदा पुढे ढकलण्यात आलेल्या या पेपरमुळे प्रशासनाला नवीन ‘सेट’मधील जवळपास २० हजार प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पाठवण्याची कसरत करावी लागणार आहे.
बी.कॉम. प्रथम वर्षांच्या हिंदी व मराठी विषयांचे पेपर सुरुवातीला लोकसभा निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर २१ एप्रिल ही नवीन तारीख विद्यापीठाने अधिसूचनेद्वारे घोषित केली होती. दोन आठवडय़ापूर्वी हा पेपर २२ एप्रिलला घेण्यात येणार असल्याचे संकेतस्थळावर जाहीर केले. परंतु दयानंद आर्य महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पोहोचलीच नाही.
विद्यार्थी सोमवारीच पेपर आहे असे समजून परीक्षा द्यायला सकाळी नऊच्या सुमारास पोहोचले. परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांना पाकीट फोडून प्रश्नपत्रिका वाटल्या. काही विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यासही सुरुवात केली. त्यानंतर २० मिनिटांनी विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका परत घेण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना पेपर नसल्याची माहिती देण्यात आली. या गोंधळानंतर लागलीच प्राचार्यानी परीक्षा विभागाला माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वंदना खुशलानी यांनी ऑनलाईन अधिसूचना वाचन्यात न आल्याने गोंधळ झाल्याचे मान्य केले. परीक्षेची देखरेख करणाऱ्या दोन शिक्षकांकडून नकळत ही चूक झाली, असे त्या म्हणाल्या. त्यांनी तातडीने परीक्षा नियंत्रकाचीही भेट घेतली. कुलगुरूंनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान परीक्षा नियंत्रक विलास रामटेके म्हणाले, प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार नकळत होत असतात. कोणतीही व्यक्ती ते जाणीवपूर्वक करीत नाही. अशी प्रकरणे शिस्तपालन कृती समितीकडेही जातात.