लेखकाने एखादी उत्कृष्ट कादंबरी लिहावी, वाचकांना ती पसंत पडावी आणि जगभर तिच्या लाखो आवृत्त्या खपाव्यात.. मग एखाद्या चित्रपटनिर्मात्याने त्या साहित्यकृतीचे हक्क विकत घेऊन तीवर चित्रपट तयार करावा व तिकीटबारीवरही तो चालावा.. असा ट्रेण्डच गेल्या काही वर्षांत तयार झाला आहे. हॉलिवूडपटांतून झिरपलेला हा ट्रेण्ड आपल्याकडे चांगलाच रूजलाय. यापूर्वी हा ट्रेण्ड होता मात्र त्याचा पोत वेगळा होता. रवींद्रनाथ टागोरांच्या कथा-कादंबऱ्यांपासून ते मुन्शी प्रेमचंद, शरतचंद्र चॅटर्जी, इस्मत चुगताई अशा लेखकांच्या साहित्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. परंतु त्या चित्रपटांचा बाज वेगळाच होता. आता मात्र यशाची हमखास हमी असेल अशाच लेखकांना प्राधान्य दिले जाते. त्यात चेतन भगतचे नाव अगदी अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
आयआयटी इंजिनीअर ते यशस्वी लेखक अशी त्याची ओळख आहे. वन नाइट अ‍ॅट अ कॉल सेंटर, थ्री इडियट्स, काय पो चे, टू स्टेट्स हे सर्व चित्रपट त्याच्या गाजलेल्या कादंबऱ्यांवरूनच काढण्यात आले. वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर या चित्रपटाचा अपवाद वगळता बाकीच्या तीनही चित्रपटांनी चांगली कमाई केली. आता तर त्याचे प्रत्येक पुस्तक प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याचे चित्रपटासाठी कॉपीराइट्स घेतले जात आहेत. त्याच्या ‘रिव्हॉल्यूशन २०२०’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पुस्तकाचे हक्क यू टीव्ही प्रॉडक्शनने विकत घेतले असून त्यावरील चित्रपट ‘घनचक्कर’ फेम राजकुमार गुप्ता दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका असतील. तर अजून प्रदर्शितही न झालेल्या त्याच्या सहाव्या ‘हाफ गर्लफ्रेंड’वर मोहित सुरी चित्रपट दिग्दर्शन करणार आहे. आणि खुद्द चेतन भगत या चित्रपटाचा निर्माता म्हणून नवी सुरूवात करतो आहे.
चेतनला मिळालेल्या यशामुळे बॉलिवूडच्या तरुण चित्रपटकर्मीनी नव्या लेखकांच्या साहित्याकडे मोहरा वळवला आहे. मोहन सिक्का यांच्या ‘द रेल्वे आंटी’ या लघुक थेवर अजय बहल दिग्दर्शित ‘बी. ए. पास’ या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता लेखक अमिष त्रिपाठीची ‘बेस्ट सेलर’ ठरलेली ‘शिवा ट्रायोलॉजी’ही तीन चित्रपटांच्या माध्यमातून येणार आहे. दिग्दर्शक करण जोहरने त्याचे हक्क विकत घेतले असून एका अमेरिकन निर्मात्यानेही या कादंबऱ्यांसाठी एक अब्ज डॉलर्स मोजले आहेत, त्यामुळे ही आमिषची ‘शिवा ट्रायोलॉजी’ आता हॉलिवूडपटातूनही जगभर पोहोचणार आहे. याशिवाय, ग्यान प्रकाश यांच्या ‘मुंबई फॅबल्स’ या कादंबरीवर आधारित अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’ पुढच्या वर्षी पहायला मिळणार आहे. तर अनुजा चौहान यांची ‘बॅटल ऑफ बिटोरा’ ही कादंबरी चित्रपटरुपात आणण्यासाठी सोनम कपूरने प्रयत्न सुरू केले आहेत.