शहरातील रस्ते आणि रस्त्यांवर असलेले खड्डे ही प्रत्येकाची समस्या असून या खड्डय़ांमुळे मोठय़ा प्रमाणात पाठ, कंबरेच्या व्याधींनी नागरिक त्रस्त असल्याचे दिसून आहे. शहरातील कुठल्याही भागात सायंकाळच्यावेळी फिरायला जायचे असेल किंवा वाहतुकीच्या मार्गावर दुचाकी घेऊन जायचे असेल तर नागरिकांनी रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमुळे कुठला आजार तर उद्भवणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवडय़ात तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागातील रस्ते कमी आणि खड्डे जास्त असे चित्र दिसून येत आहे. गेल्यावर्षी महापालिकेने अनेक भागात रस्त्यांवर डांबरीकरण केले असताना त्या रस्त्यांची आज दुर्दशा झाली आहे. या खड्डय़ांमुळे लोकांना पाठीचे आणि मानेचे आजार वाढल्याच्या तक्रारी आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीरोग विभागात गेल्या महिन्याभरात तपासणी आलेल्या रुग्णांमध्ये तीनशेच्यावर रुग्ण पाठीच्या आणि मानेच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले.   खडय़ामुळे केवळ आजार उद्भवत नाही तर शहराच्या विविध भागात अनेकांचे जीव गेले आहेत. अनेकजण विविध व्याधींनी त्रस्त आहे. विशेषत पाठीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या संदर्भात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, साधारण ज्या भागात खड्डे आहेत अशा भागात दुचाकी चालविल्यामुळे कमरेचे आणि पाठीचे आजार होत असतात. विशेषत मणक्याचे आजार जास्त होतात. दुचाकी चालवणाऱ्यांना साधारणत:  स्पांॅडेलिसीस, लम्बर्स स्पॉंडेलिसीस, स्लीप डिस्क हे आजार होण्याची जास्त शक्यता आहे. त्यातही अस्थिरोग किंवा व्यंग असेलले रुग्ण असतील तर त्यांना कमरेचे आणि पाठीचे आजार लवकर होत असतात. साधारणत: खड्डय़ांवरून गाडी उसळली तर कमरेचे आणि पाठीचे आजार होत असतात, असेही चौधरी यांनी सांगितले.