पावसाने मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जोरदार हजेरी लावली आहे. पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी छत्र्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने त्याची बाजारात मोठी मागणी आहे. परंतु यंदा बाजारातील चायनीज छत्र्या बाजारात आल्या आहेत. त्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे छत्र्या बनवून त्या विकणाऱ्या व तुटलेल्या छत्र्यांची दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांवर या चायनीज छत्र्यांमुळे नवे संकट उभे राहिले आहे.
पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्यांना अधिक प्राधान्य दिले जाते, त्यातही एकदा छत्री घेऊन ती दुसऱ्या वर्षांच्या पावसात दुरुस्त करून वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे छत्र्यांच्या वाढत्या किमती असून याला आता चायनीज छत्र्यांनी पर्याय दिला आहे. असे असतानाही जुन्याच छत्र्यांची दुरुस्ती करून वापरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी नाही त्यामुळे उरण शहरात सुरू झालेल्या पावसामुळे छत्र्या दुरुस्त करणाऱ्यांच्या व्यवसायात वाढ झालेली आहे.
छत्रीची तार बदलण्यासाठी वीस ते पंचवीस रुपये मोजावे लागत आहेत, तर दांडा बदलून घेण्यासाठी तीस ते पस्तीस रुपये मोजावे लागत आहेत. सध्या छत्र्यांमध्ये अनेक प्रकारच्या छत्र्या उपलब्ध असतानाही जुन्या छत्र्या दुरुस्त करून वापरणाऱ्यांचीही संख्या कमी नाही, ‘जुने ते सोने’ म्हणत अनेक जण या छत्री दुरुस्त करणाऱ्यांच्या व्यवसायालाही नकळतच हातभार लावीत आहेत. छत्री दुरुस्तीच्या व्यवसायातून पावसाळ्यात दिवसाला किमान पाचशे रुपये मिळत होते. त्यातील मजुरी आणि साहित्याची रक्कम वजा जाता चांगले पैसे मिळत होते. मात्र पावसाने दडी मारल्याने व चायनीज छत्र्यांचे संकट आल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे छत्री दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या नीलेश झिंगाट यांनी सांगितले.