केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीच्यावेळी ‘अच्छे दिन आयेगे’ म्हणून केवळ घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र सहा महिन्यात देशात ‘बुरे हाल’ची सुरुवात झाली आहे, अशी टीका करून  राज्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी बसपाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली.
बहुजन समाज पक्षाच्या जिल्ह्य़ातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे प्रभारी माजी खासदार वीरसिंग, डॉ. सुरेश माने, कृष्णा बेले, विश्वास राऊत आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी ‘अच्छे दिन’ची घोषणा केल्यानंतर केंद्रात बहुमतात त्यांचे सरकार आले मात्र सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले तरी महागाई कमी झाली, महिलांना सुरक्षा नाही, आर्थिक धोरणामध्ये बदल झालेला नाही, पाकिस्तानाकडून भारताच्या सीमेवर गोळीबार सुरूच आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे अच्छे दिन ऐवजी आता बुरे दिन सुरू झाले आहे, अशी टीका मायावती यांनी केली. निवडणुकीच्यावेळी मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दाखविली जात असून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे मात्र कुठल्याही अमिषाला बळी पडू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. प्रलोभने स्वीकारली तर डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा आणि त्यांनी केलेल्या संघर्षांचा अपमान होईल. उत्तरप्रदेशमध्ये बसपाचे सरकार असताना समाजातील गोरगरीब आणि दलित समाजासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले होते तसेच निर्णय राज्यात बसपाचे सरकार आल्यानंतर घेण्यात येईल असेही मायावती म्हणाल्या. यावेर्ळी मायावती यांनी काँग्रेसवर राज्याच्या कार्यपद्धीवर टीका केली. बसपाचे नेते कांशीराम यांनी दलित समाजासाठी संघर्ष केला तो महाराष्ट्रात केला आहे त्यामुळे राज्यात बसपाचे सरकार आणले तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही मायावती म्हणाल्या.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बसपाने सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे त्यामुळे राज्यात बसपाचे सरकार आल्यास सर्वप्रथम स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव आणून केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. स्वतंत्रविदर्भासाठी अन्य सर्व राजकीय पक्ष केवळ विदर्भवाद्यांना आश्वासने देत असले तरी आम्ही मात्र आश्वासने न देता करून दाखवू, असेही मायावती म्हणाल्या.