महापालिकेने रस्त्यांच्या दुरावस्थेची चौकशी करावी, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीने केली आहे.
तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील वरचा खडीचा थर उखडून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विशेषत: दुचाकीधारकांना वाहने चालवणे कठीण होऊन बसले आहे. याच पावसामुळे उड्डाणपुलावरील रस्त्यांवर काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने महापालिका आयुक्तांना पत्र देऊन रस्त्यांच्या बांधकामाला जबाबदार असलेल्या ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनतेच्या पैशातून हे रस्ते तयार झाले असून शहरातील याच रस्त्यांसाठी प्रत्येक वाहनचालक रोड टॅक्स व्यतिरिक्त डिझेल व पेट्रोलवर एक रूपये प्रतिलीटर कर वसूल करीत आहे. शहरातील याच रस्त्यांसाठी चारचाकी वाहनांकडून टोलटॅक्स वसूल करणे अजूनही सुरूच आहे. सर्व रस्त्यांसाठी नागपूरकरांकडून पैसा वसूल करण्यात येत असेल तर योग्य गुणवत्तेचे रस्ते बनवणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याने महापालिकेने याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज असल्याचे पक्षाचे सचिव रामेश्वर चरपे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.