जिल्हा बँकेची बदनामी आणि हिरे घराण्यावर आरोप करणे थांबवावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले येथे केले. नाबार्डच्या नियमाप्रमाणे जिल्हा बँकेचे कामकाज करण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे अडवणूक न करता मोजक्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज देऊन साहाय्य केले जात आहे. तथापि, काही मंडळी हेतुपुरस्सर बँकेची बदनामी करीत आहेत. हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
संगणकीकरण गरजेचे असल्याने ते काम नाबार्डच्या आदेशाप्रमाणे होत आहे. रोहिले आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि २०११-१२ अखेर बँक कर्जाची शंभर टक्के परतफेड करणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव व तालुक्यातील सरपंच यांचा सत्कार तसेच भेटवस्तू वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी आ. डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिक जिल्ह्याचा विकास अनेक वर्षांपासून झालेला नाही. पाण्याचा प्रश्न बिकट असून गुन्हेगारीत वाढ होत आहे, असा आरोप केला. जिल्हा बँकेचे संचालक आ. अ‍ॅड. उत्तम ढिकले, राजेंद्र डोखळे, नानासाहेब सोनवणे, शिवराम झोले यांनी जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कामाची माहिती दिली. बँकेचे मुख्य व्यवस्थापक सुभाष देसले व रोहिले सोसायटीतर्फे नामदेवराव कसबे यांनी प्रास्ताविक केले.
व्यासपीठावर त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष योगेश तुंगार, उपनगराध्यक्ष ललित लोहगावकर, त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या सभापती योगिता मौले, उपसभापती शांताराम मुळाणे आदी उपस्थित होते.