श्वान पाळणाऱ्यांसाठी श्वानाचे कितीही लाड केले तरी कमीच वाटते. कुठेही जाताना त्याच्या गळ्याभोवती पट्टा बांधून त्याला ऐटीत घेऊन जाताना किंवा त्याला मस्तपैकी आपल्या कुशीत खेळवत बाहेर फेरफटका मारायला जाणे हा त्यांचा आवडता शौक असतो. सर्वच ठिकाणी या कुत्र्याला पट्टा बांधून नेणे शक्य नसते. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी स्वैर सुटणारा श्वान सांभाळताना कित्येकदा नाकीनऊ येतात. अशा श्वानप्रेमींसाठी आता खास  बॅग्स बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
घरात श्वान असला की, घरातले प्रत्येकजण त्याच्या मागेपुढे फिरताना दिसतात. त्याच्या खाण्याच्या, फिरायला नेण्याच्या वेळांच्या गणितावरून घरात प्रत्येकाचे वेळापत्रक आखले  जाते. त्यात श्वानासाठी कपडे, टोपी, बिछाना अशा विविध गोष्टी विकत घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. श्वानांसाठीही ब्रॅण्डेड खाद्य, स्पा, ब्युटी थेरपीसुद्धा आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. घरात एखाद्या राजकुमारासारखा रुबाब असलेल्या या श्वानाला बाहेर घेऊन जातानाही त्याची विशेष काळजी घेतली जाते. त्याच्यासाठी सुंदर बेल्ट, शूज, छत्रीही विकत घेतली जाते. फिरायला जाताना सोयीच्या दृष्टीने आपल्या लहान मुलाला खांद्यावर बांधून ठेवणे कित्येकजण पसंत करताना दिसतात.
पग, पफ, चिनुहा यांसारख्या लहान कुत्र्यांना कुशीत घेऊन फिरायला जाणे हा त्यांच्या मालकांचा आवडता छंद असतो. पण गर्दीच्या ठिकाणी किंवा खरेदीच्या वेळी सतत खांद्यावर असलेल्या या श्वानाला सांभाळणे जिकिरीचे होते. त्यामुळे अशा मालकांच्या सोयीसाठी श्वानांसाठी खास कस्टममेड बॅग्स बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कित्येक  सेलेब्रिटीज श्वानांसाठी वापरात येणाऱ्या ब्रॅण्डेड बॅग्सच्यामागे हजारो रुपये खर्च करताना दिसतात. पण या बॅग्स स्त्रियांच्या असल्यामुळे पुरुषांना या बॅग्समध्ये श्वानांना घेऊन जाणे शक्य नसते. तसेच या बॅग्स चामडय़ाच्या बनलेल्या असतात, श्वानांसाठी ते एक प्रकारचे खाद्य असल्याने ते या बॅग्स कुरतडतात, असे डिझायनर अपराजिता तूर हिने सांगितले. यामुळे श्वानांसाठी बॅग्ज तयार करताना चामडय़ासारखे दिसणाऱ्या कृत्रिम ‘लेदरेट’ फॅब्रिकचा वापर केला जातो. तुमच्या कुत्र्याच्या आकारानुसार आणि तुमच्या आवडीच्या डिझाईनमध्ये बॅग्स उपलब्ध होतात. साधारण ४,००० रुपयांपासून या बॅग्स बाजारात उपलब्ध आहेत. ऑर्डर दिल्यावर साधारण सहा ते सात दिवसांच्या कालावधीमध्ये या बॅग्स बनवून तयार होतात.
मृणाल भगत, मुंबई