शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये गुरुवारी शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेबांच्या अस्थिकलश दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या.  शहरातील सर्वपक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी अस्थिकलशास पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
सकाळी आठ वाजेपासूनच शिवसेना कार्यालयाजवळ नागरिकांनी गर्दी केली होती.  मध्यवर्ती कार्यालयात फुलांची सजावट करुन बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर अस्थिकलश ठेवण्यात आला होता.  शिवसैनिकांना अक्षरश: गहिवरून आले. अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी कार्यालयात दिवसभर नागरिकांची रांग लागलेली होती. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर माजी महापौर विनायक पांडे यांनी ‘सूर्यास्त.’ असा मोठा फलक लावला आहे. तसेच कार्यालयाच्या बाहेर रांगोळीच्या माध्यमातून बाळासाहेबांची प्रतिमा काढण्यात आली.
या वेळी शिवसेनेचे आमदार बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिके तील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, काँग्रेसचे उध्दव निमसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे, रिपाइंचे प्रकाश लोंढे, यांसह इतरही पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. सजविलेल्या रथावरून शुक्रवारी शहरातील प्रमुख भागांतून अस्थिकलश यात्रा काढण्यात येणार आहे. बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी विविध संघटनांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते.