‘गोविंदा रे गोपाळा..’ म्हणत लाखालाखांच्या बक्षिसासाठी चौकाचौकांत थर जमवायचे. वरच्या थरावर एखाद्या बालगोविंदाला चढवून त्याच्याकडून हंडी फोडायची.. आणि बक्षिसाची रक्कम खिशात घालून पुढे निघायचे. गोविंदा मंडळांची ही कार्यपद्धत बंद होण्याची शक्यता आहे. कारण, १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडीमध्ये वरच्या थरांवर चढविण्यावर ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’ने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
दहीहंडीमध्ये १२ वर्षांखालील मुलांना वरच्या थरांवर चढविल्याचे दिसल्यास संबंधित मंडळावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश बाल हक्क संरक्षण आयोगाने पोलिसांना दिले आहेत.
बालहक्क संरक्षण आयोगाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत कठोर निर्णय घेण्यात आले. सगळ्यात वरच्या थरावरुन दहीहंडी फोडण्यासाठी बालगोविंदांचा सहभाग दहीहंडीमध्ये केला जातो. मात्र अनेक वेळा गोविंदा मंडळांनी लावलेले मनोरे कोसळतात. यामध्ये जखमी होणाऱ्या बालगोविंदांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सार्वजनिक दहीहंडी मंडळांना हा खेळ वाटत असेल परंतु, यामध्ये बालगोविंदांच्या जिवाशी खेळ होतो, हे मंडळांनी लक्षात घ्यावे अशी भूमिका बालहक्क संरक्षण आयोगाच्या बैठकीत अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी मांडली. येत्या १८ ऑगस्ट रोजी दहीहंडी सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीतील निर्णयानुसार आता १२ वर्षाखालील मुले दहीहंडीत वरच्या थरावर चढविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास दहीहंडी मंडळांवर कारवाईचा बडगा उठणार आहे.