स्थानिकांचा विरोध, पुरातन वारसा हक्क जतन समितीचे आक्षेप अशा विविध कारणांनी गेली चार वष्रे रखडलेले वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अखेर डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होत आहे. पुरातन वारसा समितीच्या सूचनांचे पालन करत पालिकेने नव्याने आराखडा दाखल केला असून तलावाचे क्षेत्रफळ कायम ठेवण्यात येईल.
मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत ५१ तलाव आहेत. त्यातील बहुतांश तलावांची दुर्दशा झाली आहे. अतिक्रमण, कचरा, तलावात वर्षांनुवष्रे साठलेला गाळ यामुळे कधीकाळी शहराची ओळख असलेले हे तलाव आज मृतावस्थेत आहेत.
त्यातील कलिना तलाव, चरई तलाव, वांद्रे तलाव आणि चांदिवली तलाव या चार तलावांच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले असून या आíथक वर्षांत त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला जवळच असलेला वांद्रे तलाव हा साधारण २०० वष्रे जुना आहे. शहरातील इतर तळी नामशेष झाली असतानाच मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या मोजक्या ठिकाणांमध्ये या तलावाचा समावेश होतो. या तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव पालिकेत चार वर्षांपूर्वी आला होता. मात्र त्याला सुरुवातीला स्थानिकांनी विरोध केला.
त्यानंतर पालिकेने तयार केलेला सुशोभीकरणाच्या आराखडय़ाला पुरातन वारसा समितीने मान्यता नाकारली. तलावाच्या कडेला पायवाट बांधल्यास तलावाचे क्षेत्रफळ कमी होईल, असे मत समितीने व्यक्त केले. त्यानुसार नव्या आराखडय़ात पायवाट रद्द करण्यात आली आहे. तसेच जुन्या आराखडय़ातील अ‍ॅम्फी थिएटरची जागाही लहान करण्यात आली आहे.
नवा आराखडय़ाला पुरातन समितीकडून आठवडाभरात मान्यता घेण्याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या तलावाच्या सभोवार जाळी लावण्यात आली आहे. रस्त्यावरच्या जाणाऱ्या-येणाऱ्यांना तलाव दृष्टिपथात येण्यासाठी ती जाळी काढून टाकली जाणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षारक्षकही नेमण्यात येणार असून तलावात कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
कधीपर्यंत पूर्ण होणार- सुशोभीकरणाच्या कामासाठी पाच महिने लागतील. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कामाला सुरुवात होईल.
काय बदल होणार -तलावाच्या मध्यभागी म्युझिकल फाउंटन, बोटिंगची सुविधा, तलावाभोवतीची जाळी काढणार.
तलावाचे क्षेत्रफळ – ७.५ एकर, वारसा श्रेणी दोनमध्ये समाविष्ट इतर तीन तलावांचेही सुशोभीकरण

* वांद्रे तलावाखेरीज कलिना तलाव, शीव येथील चरई तलाव     तसेच चांदिवली तलावाचेही पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सांताक्रूझ येथील कलिना तलावात दोन ते तीन मीटर उंचीचा डेब्रिजचा ढीग झाला आहे. हे डेब्रिज इतरत्र नेण्याऐवजी तलावाच्या कडेलाच त्याचा उंचवटा करण्याचा पालिकेचा विचार आहे.

* शीव येथील चरई तलावात गणेशविसर्जन केले जाते. तलावाची उंची सुमारे दहा मीटर आहे. मात्र या तलावात सहा ते सात मीटर उंचीचा गाळ साठला आहे. हा गाळ बाहेर काढला जाणार असून गणेशविसर्जनासाठी लहानसे तळे ठेवले जाईल, जेणेकरून पूर्ण तलावात गाळ साठणार नाही.

* पवई येथील चांदिवली तलावाचे काम अजून हाती घेण्यात आलेले नाही. या तलावाशेजारी बांधलेल्या िभतीची उंची कमी केली जाणार आहे.
याशिवाय सर्व तलावांशेजारी चालण्यासाठी मार्ग, बसण्याची व्यवस्था केली जाईल.