पूर्व नागपुरात अपघातग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारडी भागात साकारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या वैशिष्टय़पूर्ण पुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होत असून या प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण सुरू झाले आहे.
ओव्हरब्रिज, अंडरब्रिज आणि ग्रेड सेपसेटर अशी ओळख असलेला हा पूल १० पदरी (४ पदरी भुसारी आणि ६ पदरी वरून) राहणार असून त्याची एकूण लांबी ४.५ किलोमीटर राहणार आहे. या प्रकल्पासाठी ४६९.१६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पारडी-भंडारा मार्गावर गेल्या दहा वषार्ंत १५० पेक्षा जास्त अपघात झाले. प्रत्येकवेळी या भागात पुलाची मागणी केली जात होती. पूर्व नागपूरचे माजी आमदार आणि मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याकडे अनेकदा मागणी केल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी पारडी भागात पूल तयार करण्याचे आश्वासन दिले होते. २००९ च्या निवडणुकीत सतीश चतुर्वेदी यांचा पराभव झाला आणि भाजपचे कृष्णा खोपडे निवडून आले. खोपडे यांनी पुलासंदर्भात गेल्या पाच वषार्ंत पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारने हा प्रकल्प साकारण्याची तयारी दाखविली. दोन महिन्यात या प्रकल्पासाठी ४६९.१६ कोटी मंजूर करण्यात आले आहे आणि आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले जात आहे. भाजप या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी आता श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. पारडी भागात पूल व्हावा यासाठी सहा वर्षांंपूर्वी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्याचे ते सांगत आहेत.
या प्रकल्पात भुयारी मार्ग, उड्डाण पूल व रेल्वे भुसारी मार्ग अशा तीन कामांचा समावेश आहे. भुयारी मार्गाची लांबी २.५० किलोमीटर राहणार आहे. सर्व प्रकारच्या व्यावसायिक व जड वाहतुकीसाठी पारडी नाक्यानंतर कामडी सभागृहापासून चार पदरी भुयारी मार्ग सुरू होईल. पारडी बाजाराजवळ भुयारी मार्ग संपून आस्था रुग्णालयापासून पुन्हा भुयारी मार्ग सुरू होऊन तो कळमना मार्केटकडे जाईल. हाच मार्ग जुना भंडारा रोडकडे येताना हॉटेल मोर्याजवळ पुन्हा समतल रस्त्यावर बाहेर येईल. या संपूर्ण भुयारी मार्गावरून पोच मार्गावर जाण्यासाठी स्लॅब टाकण्यात येणार आहे. याच कामातंर्गत नागनदीवरील पूल ३६ मीटर रुंद करून त्याचे नवीनीकरण करण्यात येईल. प्रकाश व्यवस्थेसाठी ५ मीटर जागा रुंद रिकामी राहील. या मार्गावर दोन्ही बाजू मिळून एकूण २२ मीटर रुंदीचे ६ पदर राहतील. पुढील ३० ते ३५ वर्षे कोणतेही खोदकाम करावे लागणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.