राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विविध शासकीय विभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नियुक्तया होत असताना भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आता सरसावले असून त्यांनी थेट केंद्रातील नेत्यांशी पत्रव्यवहार करून नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विविध महामंडळे किंवा मंत्र्यांच्या विभागात नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले होते, तर काही दिल्ली आणि मुंबईला जाऊन पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन उजेडात राहू पाहत आहेत. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर पक्षाने जिल्ह्य़ातील विविध आघाडय़ांकडून नावे मागविली होती, त्याप्रमाणे प्रत्येक आघाडीने ३० कार्यकर्त्यांच्या नावांची यादी तयार करून ती शहर पातळीवरील स्थानिक नेत्यांकडे दिली होती. काही दिवसांनी ती यादी १५ वर आली. त्यानंतर पक्षाच्या काही वरिष्ठांनी ती पाचवर आणली आणि त्यात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावे गाळण्यात आली. त्यानंतरही अनेकांनी आपापल्या ‘गॉडफादर’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यात काहींना लॉटरी लागली तर काही नेत्यांच्या माध्यामातून अजूनही प्रयत्न करीत आहेत.
दरम्यानच्या गेल्या तीन महिन्याच्या काळात विविध विभागात मर्जीतील स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्ही पक्षात केवळ सतरंज्या उचलायच्या का? असा प्रश्न उपस्थित करून केंद्रामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशच्या कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावांची यादी असून या यादीमध्ये जे सक्रिय असतील त्यांचा विचार केला जातो. मात्र, अन्य कार्यकर्त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तीन महिन्यानंतर अनेक मंत्री आणि आमदारांनी स्वतच्या कार्यालयासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती सुरू केली आहे. विशेषत: मंत्र्यांच्या कार्यालयासाठी नियुक्ती होत असताना पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा संघातील स्वयंसेवकांना किंवा मर्जीतील कार्यकर्त्यांना स्थान दिले जाते. नुकतेच नागपुरातील एका मंत्र्यांच्या कार्यालयीन कामासाठी चार कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात संघाच्या स्वयंसेवकांना स्थान दिले असल्याची माहिती समोर आली. याशिवाय मुंबईलासुद्धा अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्तया केल्या जात आहेत. मात्र, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नाही. पुढील महिन्यात महामंडळांवर नियुक्तया होणार असल्यामुळे पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता थेट दिल्ली गाठून केंद्र पातळीवर पक्षातील नेत्यांशी पत्रव्यवहार केला. त्यात नियुक्ती करताना पक्षातील कार्यकर्त्यांचा विचार केला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यांला पत्रव्यवहाराबाबत विचारले असता त्यांनी पत्र पाठविले असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. जे नेत्यांची मर्जी सांभाळतात त्यानांच नियुक्ती दिली जात असल्याची टीका केली.