याकूब मेमनच्या फाशीनंतर नवी मुंबईमधील खारघर येथे राहणाऱ्या झुबेर खान या पत्रकाराने थेट इसिस संघटनेत जाण्याची इच्छा समाजमाध्यमांवर व्यक्त केली. या घटनेनंतर पनवेल व उरण परिसरात जातीय सलोखा अबाधित राहावा, यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी लोकप्रतिनिधी, प्रत्येक शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधला. जातीय सलोखा राखण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करा, पण हे माध्यम वापरताना समाजभान ठेवा, असा सल्लाही त्यांनी या बैठकीत दिला. रंजन यांनी पदभार स्वीकारल्यापासून पनवेल परिसरात पहिल्यांदाच पोलीस-नागरिक बैठक खांदेश्वर येथील श्रीकृपा सभागृहात घेतली.
आयुक्त रंजन यांनी नागरिकांना आपल्या देशात कोणताही धर्म संकटात नसल्याचे सांगितले. मानवता व माणुसकी हा एकच धर्म सर्व नागरिकांनी पाळल्यास कोणतेही तंटे होणार नाहीत, आणि त्यामुळे पोलिसांना इतर प्रकरणांमध्येही लक्ष्य घालता येईल असे या वेळी सांगितले. याकूबच्या फाशीच्या घटनेची आठवण करीत आयुक्त रंजन यांनी नागरिकांना या घटनेतून बोध घेण्याचे सुचविले. याकूबच्या फाशीनंतर समाज माध्यमांवर चांगल्या वाईट अशा प्रतिक्रिया उमटल्या, परंतु त्याच्या धर्मातील चांगल्या लोकांनी अशा वेळी पुढे येऊन आपल्या धर्माच्या लोकांना चांगले काय हे आवर्जून सांगणे तेवढेच गरजेचे असल्याचे रंजन यांनी सांगितले. या बैठकीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत, प्रांताधिकारी सुदाम परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण, तहसीलदार दीपक आकडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.