चारचाकी वाहनांचे बनावट सुटे भाग अस्सल असल्याचे दर्शवत शहरात त्यांची राजरोसपणे विक्री होत असल्याची बाब उघड झाली आहे. द्वारका येथील तीन दुकानांमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या नावाने वाहनांच्या बनावट सुटय़ा भागांची विक्री केली जात होते. पोलिसांच्या मदतीने कंपनीने छापा टाकल्यावर ही बाब निदर्शनास आली. या प्रकरणी संशयित व्यावसायिकांविरुध्द तक्रार देण्यात आली आहे. वाहनांचे सुटे भाग खरेदी करताना ग्राहकांनी ते असली आहेत की नकली याची शहानिशा करणे आवश्यक आहे. वाहन कंपन्यांच्या नावाने बनावट सुटे भाग ग्राहकांच्या माथी मारले जाऊ शकतात. निकृष्ट दर्जाच्या सुटय़ा भागामुळे ग्राहकांची दुहेरी फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शहरातील काही दुकानांमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या नावाने बनावट सुटय़ा भागांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. टाटा मोटर्स कंपनीने अशा प्रकरणात कारवाईचे अधिकार इ.आय.पी.आर. कंपनीस दिले आहे. या अधिकारात संबंधित कंपनीच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने द्वारका परिसरातील कथडा मार्केट संकुलात धाडी टाकल्या. यावेळी तीन दुकानदारांकडून टाटा कंपनीच्या नावे बनावट मालाची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मालाची तपासणी करण्यात आली. तेव्हा गोदावरी ऑटो एजन्सी, चॅम्पिअन ऑटो क्लच आणि गुरुनानक ऑटो स्टोअर्स दुकानांमध्ये टाटा क्लच प्लेट, टाटा लिव्हर प्लेट, टाटा ओव्हर ऑईल ड्राईव्ह गिअर, एमआरपी स्टिकर्स असे एकूण ८४ बनावट नग आढळून आल्याचे कंपनीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधितांकडे मुद्देनिहाय मालाच्या खरेदीची कागदपत्रे मागितली असता ते सादर करू शकले नाहीत. संबंधित दुकानदारांकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी हंबीरराव साठे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकी असो वा चारचाकी असो, सर्वसाधारपणे वाहनांच्या दुरुस्तीवेळी जागरुक ग्राहकांचा कल कंपनीचे खरे सुट्टे भाग घेण्याकडे असतो. स्थानिक कंपन्यांच्या मालाच्या दर्जाविषयी शाश्वती नसल्यामुळे खरे सुट्टे भाग खरेदी केले जातात. त्यासाठी जादा किंमत मोजण्याची ग्राहकांची तयारी असते. तथापि, आपण खरेदी केलेले सुटे भाग खरे आहेत की बनावट हे ओळखणे अवघड ठरते. सुट्य़ा भागांचे तांत्रिक विश्लेषण करणे अवघड असते. काही अनिष्ट प्रवृत्ती प्रतिष्ठित कंपन्यांच्या मालाची हुबेहुब नक्कल करत असल्याने ग्राहक संबंधित कंपनीचा माल समजून तो खरेदी करतात, त्यासाठी जादा किंमतही मोजतात. पण, अशा प्रसंगात जादा पैसे देऊन खरेदी केलेला मालही बनावट असण्याचा धोका संभवतो. यात ग्राहकांची दुहेरी फसवणूक होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. वाहनांची दुरुस्ती स्थानिक पातळीवरही मोठी बाजारपेठ आहे. काही कंपन्या प्रतिष्ठित कंपन्यांच्या मालाची नक्कल करून विक्री करतात. या नकली मालाच्या विक्रीमुळे ग्राहकांबरोबर शासनाचा महसूल बुडतो आणि संबंधित कंपन्यांनाही फटका बसतो. शहर व परिसरात याआधी असे प्रकार उघड झाले आहेत. यामुळे ग्राहकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.