अपंगांच्या संस्था अतिशय समर्पित वृत्तीने चालविल्या तर त्यातून अनेक गुणवंत पुढे येऊ शकतात. त्यामुळे शासन यापुढे या क्षेत्रात समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांना मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित सोनेगाव येथील कर्णबधिर विद्यालयात माजी आमदार दिवंगत गंगाधरराव फडणवीस आणि माजी आमदार दिवंगत दिवाकरराव जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंधासाठी आणि कर्णबधिरासांठी बुद्धिबळ स्पर्धा तसेच कामगार नेते दिवंगत गो.म. खाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्णबधिरांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, माजी खासदार दत्ता मेघे, डॉ. विलास डांगरे, चंद्रकांत कलोती, संस्थेचे मुख्य सचिव दिलीप धोटे उपस्थित होते.
दिलीप धोटे व त्यांच्यासारख्या अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी आजपर्यंत अपंगांच्या शिक्षणासाठी आंदोलने केली. त्यांच्या पदरी आजपर्यंत फारसे काही पडले नाही. आता, यापुढे अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. शासन अशा संस्थांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले. अपंग विद्यार्थ्यांना निसर्गाने एखाद-दोन बाबी दिल्या नसतील. मात्र, त्यांना बौद्धिक सामथ्र्य दिले आहे. शासन अशा मुलांमध्ये उत्तम कौशल्य निर्माण करून त्यांना रोजगार कसा मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करेल. तसेच या मुलांच्या क्षमता ओळखून त्यांना कुठेही मागे पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी दत्ता मेघे आणि डॉ. विलास डांगरे यांनीही त्यांचे विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मूकबधिर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर ‘भारत अनोखा राग है’ या गीतावर सर्वागसुंदर नृत्य सादर केले. तर अंधांनी ‘मोरया..मोरया’ या गीतावर नृत्य सादर करून आपणही काही कमी नाही, हे दाखवून दिले. या मुलांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. संस्थेचे सचिव दिलीप धोटे यांनी प्रास्ताविकातून बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.