ठाणे-बेलापूर मार्गावर दिघा, तुर्भे, शिरवणे यांसारख्या झोपडपट्टी भागांत व काही गावांत आजही रस्त्यावर शौच करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. सायबर सिटी म्हणविणाऱ्या नवी मुंबईला हे भूषणावह नाही. त्यामुळे पालिकेच्या सेवेवर अवलंबून न राहता आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून दोन कोटी रुपये खर्चाची तीस शौचालये बांधण्याचा निर्धार जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा स्वच्छतेच्या दृष्टीने पहिले पाऊल पडणार असून राज्यातील हा पहिला प्रकल्प असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा विडा उचलला आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असून विविध मान्यवरांच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. सायबर सिटी, प्लॅन सिटी, एज्युकेशन हब, ग्रीन सिटी अशी अनेक विशेषणे लावणाऱ्या नवी मुंबईत उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. सिडकोने सिडनीच्या पाश्र्वभूमीवर बांधलेल्या तुर्भे रेल्वे स्थानकाचा सर्व परिसर या उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांनी व्यापून टाकला आहे.
पुण्याहून नवी मुंबईत आलेल्या व ठाण्याहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पहाटे व सकाळी या उघडय़ावर बसणाऱ्या रहिवाशांचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सायबर सिटी म्हणविणाऱ्या पालिकेला गेली क्रित्येक वर्षे ही अस्वच्छता दूर करता आलेली नाही. येथील नगरसेवकांनीही त्या दृष्टीने कधी प्रबोधनाचे कार्य केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे पालिकेला संत गाडगेबाबा स्वच्छतेचे मिळालेले दोन पुरस्कार कोणते निकष पूर्ण केल्यानंतर मिळाले आहेत, याची नेहमीच चर्चा केली जाते. काही गावांमध्ये देखील घरांच्या जवळ वाहणाऱ्या उघडय़ा गटारांत पालक आपल्या पाल्यांना शौचास बसवीत असल्याचे दिसून आले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वच्छतेसाठी पहिले पाऊल टाकले असून आमदार निधीतून दोन कोटी या शौचालयांवर खर्च करण्यास अनुमती दिली आहे. शहरात आवश्यक असलेल्या तीस ठिकाणी ही शौचालये येत्या काळात बांधली जाणार असून त्याचा शुभारंभ २२ जुलै रोजी केला जाणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.