बंगालमधील ‘धाक’ आणि ढोलाचे रंग घेऊन शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नवदुर्गा’ विराजमान होण्याच्या तयारीत आहे.
बंगाल क्लबतर्फे साजऱ्या होणाऱ्या या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने या मैदानावर दरवर्षी जणू ‘मिनी बंगाल’ अवतरलेला असतो. या दुगरेत्सवाचे यंदाचे हे ७९वे वर्ष. यंदा कोलकातातील कालीघाट मंदिराची प्रतिकृती मंडपात उभारण्यात येणार आहे. त्या करिता कुशल कामगार अहोरात्र काम करीत आहेत.
महाचतुर्थीच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरपासून दुर्गापूजेला सुरूवात होईल. या पूजेची सांगता ३ ऑक्टोबरला विजया दशमीच्या दिवशी होईल. या दरम्यान भरणाऱ्या ‘आनंद मेळ्या’त मुंबईकरांना बंगाली खाद्यपदार्थाची चव चाखता येईल आणि बंगाली कलावस्तूंचे प्रदर्शन आणि खरेदीचा आनंदही घेता येईल. मोगलाई पराठा, कोशा मांगशो, कोलकाता पद्धतीची बिर्याणी, माछेर भात, आलूचॉप, मिष्टी दोइ, रसगुल्ला आदी बंगाली खाद्यपदार्थाची चव यावेळी मुंबईकरांना चाखता येईल. शिवाय जामदानी, धाकाई, टांगेल आदी पारंपरिक बंगाली पद्धतीच्या साडय़ांची खरेदीही करता येईल. दरवर्षी या दुगरेत्सवाला १० लाख भाविक भेट देत असतात. सप्तमी, नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी भाविकांना देवीचा प्रसाद म्हणून खिचडी, पायस (तांदळाची खीर) आदीचा लाभ घेता येईल.