पनवेल तालुक्यातील सिडको वसाहती ते रेल्वेस्थानक जोडण्याचा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने अग्रक्रमाने हाती घेतला आहे. याचा पहिला टप्पा मानसरोवर रेल्वेस्थानक ते कामोठे वसाहत खांदेश्वर रेल्वेस्थानक असा आहे, तर दुसरा टप्पा रोडपाली पोलीस मुख्यालय ते मानसरोवर रेल्वेस्थानक असा प्रवास फेब्रुवारीच्या शुभारंभापासून सुरू होत आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची पोलिसांच्या विनाआदेशाच्या परेडला पूर्णविराम मिळणार आहे.
रोडपाली नोड येथे कोणतीही वाहतूक व्यवस्था नसल्याने येथे घर घेणाऱ्यांना किमान दुचाकी अनिवार्य होती. मात्र नोकरदारवर्गाला हार्बरमार्गावरील लोकल पकडण्यासाठी रोडपाली खारघर रेल्वेस्थानक असा प्रवास किमान एक किलोमीटर चालत जाऊन करावा लागत होता. येथील प्रवाशांना बेकायदा चालणाऱ्या इकोव्हॅनशिवाय पर्याय नव्हता. व्हॅनच्या डिकी व मध्यभागी स्टुलावर बसून महिला प्रवासी कोंडवाडय़ासारखे प्रवास करत होते. अनेक वर्षांपासून एनएमएमटी प्रशासनाकडे पोलिसांनी त्याबाबत मागणी केली होती. मात्र रेल्वेस्थानकातील रिक्षाचालकांच्या विरोधामुळे ही मागणी करण्यासाठी एनएमएमटी प्रशासन धजावत नव्हते. मानसरोवर ते खांदेश्वर या बससेवेला एक महिना पूर्ण होणार यानिमित्ताने ही बससेवा सुरू होत आहे. रिक्षाचालकांची बाजू मांडणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही लांबच्या पल्ल्याची बससेवा एनएमएमटी प्रशासनाने सुरू करावी त्यामुळे कामोठे येथील रिक्षाचालकांचे नुकसान होणार नाही ही मागणी केली होती. रोडपाली मानसरोवर बससेवेमुळे ती मागणीही मान्य होत आहे. मात्र हीच बससेवा रोडपाली फूडलॅन्डच्या सिग्नलपासून सुरू झाल्यास तळोजा एमआयडीसीमधील चाकरमानी व नावडेनोडमधील शेकडो प्रवाशांना कळंबोली हायवेला जाण्याची गरज भासणार नाही हे प्रवासी थेट रेल्वेस्थानकाशी जोडले जातील.
या पल्ल्यावर तीन आसनी रिक्षातून प्रवास करण्यासाठी सामान्यांकडून मनमानी भाडे आकारले जाते. रोडपाली ते खारघर रेल्वेस्थानक कधी ८० तर कधी शंभर रुपये आकारतात. तसेच कळंबोलीच्या प्रवाशाला मानसरोवर रेल्वेस्थानक थेट गाठण्यासाठी ४० ते ६० रुपये मोजावे लागतात. रात्रीचा हाच प्रवासखर्च अंधारातल्या लुटीसारखा होतो या सर्व लुटीला एनएमएमटीची बस पर्याय ठरणार आहे.
या बससेवेची कळंबोलीकर गेल्या १० वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. रोडपाली ते मानसरोवर ही बससेवा सुरू झाल्यावर आठ दिवसांनंतर खांदेश्वर रेल्वेस्थानक ते वाया खांदाकॉलनी ते आदई सर्कल या पल्यावर बससेवा सुरू करण्याचा एनएमएमटीचा मानस आहे. या बसच्या सुरू होण्याकडे प्रवासी डोळे लावून बसले आहेत. सध्या येथे तीन आसनी रिक्षांशिवाय पर्याय नाही. १० ते १२ रुपये प्रति आसनी आकारून येथे रिक्षाच्या पुढच्या एका चाकावर तीन व मागच्या दोन चाकांवर तीन असा बेकायदा जीवघेणा प्रवास नाइलाजास्तव प्रवाशांना करावा लागत आहे.

५६ क्रमांकांची बस
रोडपाली पोलीस मुख्यालय ते मानसरोवर रेल्वेस्थानक ही बससेवा ५६ क्रमांकाची असणार आहे. रोडपाली मुख्यालय, इन्फिनिटी हाइट, कळंबोली एमएसईबी कार्यालय, चर्च, कळंबोली डेपो, कळंबोली अग्निशमन दल, कळंबोली सर्कल, कळंबोली हायवे, कळंबोली कॉलनी, कामोठे थांबा, कामोठे नोड जैनपार्क, तेथून ही ५७ क्रमांकाची बससेवा सुरू असलेल्या मार्गाने मानसरोवर रेल्वेस्थानकात जाईल. साडेसात किलोमीटरच्या या पल्ल्यावर पाच ते तेरा रुपयांत प्रवाशांना मानसरोवर रेल्वेस्थानक गाठता येईल.