बोरिवली, बेलापूर आणि ठाणे येथून प्रवाशांना थेट टर्मिनल-२ पर्यंत पोहोचवणारी बेस्टची टर्मिनल-२ फेरी एका महिन्यातच बंद करण्याची नामुष्की बेस्ट प्रशासनावर ओढवली आहे. खासदार-आमदार यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही काळासाठी ही सेवा बंद करून दसऱ्यानंतर नव्याने सुरू करायचा विचार बेस्ट प्रशासन करत आहे.
गेल्या महिन्यात मोठा गाजावाजा करत बेस्ट प्रशासनाने बोरिवली, ठाणे आणि बेलापूर या तीन ठिकाणांहून टर्मिनल-२ला येणारी वातानुकुलित बससेवा सुरू केली होती. ही सेवा टर्मिनल-२वरून रात्री साडेआठ ते अडीच या वेळेत सुरू राहील, असे सांगण्यात आले होते. बहुतांश आंततराष्ट्रीय विमाने या वेळेत मुंबईत उतरत असल्याने ही वेळ सोयीची मानण्यात येत होती.
या सेवेचे उद्घाटन करण्यासाठी काही ठिकाणी नवनिर्वाचित खासदारांनीही गर्दी केली होती. मात्र ही सेवा सुरू करण्याआधीही बेस्ट प्रशासनाने या सेवेची माहिती लोकांना दिली नव्हती. तसेच विमानतळावरही बेस्ट सेवेचा पर्याय उपलब्ध आहे, अशा आशयाचे फलक लागणे अपेक्षित होते. मात्र अशी कोणतीही प्रसिद्धी झालेली नाही. सध्या या सेवांना प्रवाशांचा प्रतिसाद खूपच लाजिरवाणा असल्याचे खुद्द बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनीच कबूल केले. या फेऱ्यांची सरासरी प्रवासी संख्या दोन ते तीन एवढीच आहे. त्यामुळे ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

मेट्रो फेरीही तोटय़ातच!
मोनोरेलला सापत्न वागणूक देऊन मेट्रोच्या स्थानकांना ‘बेस्ट’ची साथ देण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णयही त्यांच्या अंगलटी आला आहे. मेट्रो फेरी १ आणि २ या दोन्ही फेऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे गेल्या महिन्याभरात स्पष्ट झाले आहे. मरोळ आणि डी. एन. नगर येथून सुटणाऱ्या या दोन्ही बसमध्ये बेस्टने प्रत्येक फेरीला ४० ते ४५ प्रवाशांची अपेक्षा केली होती. प्रत्यक्षात जेमतेम १०-१५ प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ही फेरी बंद करण्याचा विचार बेस्ट प्रशासन करत आहे.

या सेवेला प्रतिसाद मिळावा, यासाठी आता विमानकंपन्या आणि विमानतळ प्राधिकरण यांच्याशी बैठका घेण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बेस्ट सेवेची माहिती विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना द्यावी, अशी विनंती करण्यात येणार आहे. तसेच विमानतळावर जागोजागी या सेवेची माहिती देणारे फलकही लावण्याबाबत प्राधिकरणाशी चर्चा होणार आहे. ही चर्चा सफल झाल्यानंतर दसऱ्यापासून ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार होईल.
– ओमप्रकाश गुप्ता,  बेस्टचे महाव्यवस्थापक