राहाता येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिटय़ूटच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास पुणे विद्यापीठाने यावर्षीचा उत्कृष्ठ ग्रामीण महाविद्यालय  पुरस्कार देऊन गौरविले आहे अशी माहिती महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.बी.के.सलालकर यांनी दिली.
पुणे विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे आदी प्रमुख उपस्थित होते.
शिर्डी साई रुरल इन्स्टिटय़ुटचे विश्वस्त ज्ञानदेव म्हस्के, रामभाऊ कापसे, विद्यापीठाचे सिनेट
सदस्य युवराज नरवडे, आप्पासाहेब दिघे, महाविद्यलयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्षे अ‍ॅड. रघुनाथ बोठे, प्राचार्य डॉ. बी. के. सलालकर, काळवाघे यांनी हा पुरस्कार माशेलकर यांच्या हस्ते स्वीकारला.
महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सतत उंचावत नेला आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अद्ययावत ग्रंथालय, प्रशस्त मैदाने, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवितानाच महाविद्यालयाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचे फलीत नॅक संस्थेने महाविद्यलयास ‘अ’ दर्जा प्रदान केला
आहे.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. वाय. के. अलघ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, प्राचार्य डॉ. संतपराव वाळुंज आदींनी अभिनंदन केले.