येथील आनंद अ‍ॅग्रो ग्रुप आणि गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने प्रथमच देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे होणाऱ्या गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
या बाबतची माहिती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विश्वास देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. खान्देशाची जीवनवाहिनी असलेल्या गिरणेच्या खोऱ्यात संघर्ष करत स्वतच्या जगण्याच्या नव्या वाटा शोधणाऱ्या कार्यकर्त्यांनी गिरणा गौरव प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्यावतीने कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांना गिरणा गौरवने सन्मानित केले जात असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्याचे हे १५ वे वर्ष असून पहिल्यांदाच प्रतिष्ठानाने ‘जीवनगौरव’ पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘कोसला’ आणि ‘हिंदू’ या आपल्या कांदबरीसह अन्य लिखाणाने साहित्यविश्वात वेगळा मतप्रवाह निर्माण करणाऱ्या प्रा. डॉ. नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या लेखणीचा सन्मान करण्याचा प्रतिष्ठानचा मानस असून त्यांनी त्यास अनुमती दिली आहे. ५१ हजार रोख, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. नेमाडे पुरस्कार सोहळ्यास येणार असल्याने कार्यक्रमास वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे.
या पाश्र्वभूमीवर कार्यक्रमाची आखणी, नियोजन याबाबत सारासार विचार सुरू आहे. नेपथ्यापासून सूत्रसंचालनापर्यंत सारे नेटके होण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. पुरस्कार सोहळ्यापूर्वी नेमाडे यांचा अल्पपरिचय नाशिककरांना व्हावा यासाठी पाच मिनिटांचा लघुपट, त्यांची निवडक साहित्य संपदा साहित्यप्रेमींना खुली करून देण्यात येणार असल्याचे दत्ता पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते गिरणा गौरव पुरस्काराने प्रतिभा होळकर, सुनीता पाटील, विलास पाटील, विजय हाके, संजय पाटील, कृष्णा बच्छाव, सुभाष नंदन, अभिनेत्री स्मिता तांबे, पत्रकार दीप्ती राऊत, सुरेश खानापूरकर, अविनाश भामरे, अभिमन जाधव, कवी कमलाकर देसले, डॉ. दिग्विजय सहाय यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे अ‍ॅग्रोचे अध्यक्ष उध्दव आहिरे यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्यास नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.