आगामी कुंभमेळा नेटका पार पडावा यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. सिंहस्थात ज्या ठिकाणी शाही स्नानासाठी लाखो भाविक दाखल होणार आहेत, त्या गोदाघाट परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंचवटी पोलिसांनी सोमवारी भिकारी हटाव अभियान धडकपणे राबविले. त्या अंतर्गत १०० हून अधिक भिकारी, गर्दुल्ले व नशाबाजांना ताब्यात घेऊन या परिसरात न फिरकण्याची तंबी देण्यात आली. तसेच ज्यांना औषधोपचारांची गरज होती, त्यांची रवानगी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळ्यास लवकरच सुरूवात होत असून त्यात यंदा ८० लाख ते एक कोटी भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यापासून साधु-महंत, भाविक येण्यास सुरुवात होईल. कुंभमेळ्याचे ध्वजारोहण, शाहीस्नान यासह अन्य धार्मिक कार्यक्रम प्रामुख्याने गोदा काठावर होणार आहेत. हा परिसर भिकारी, गर्दुल्ले यांचा चांगलाच वावर असतो. यामुळे गोदावरी काठाला ओंगळवाणे स्वरुप प्राप्त होते.
सिंहस्थ काळात भिकाऱ्यांचे सोंग घेत समाजकंटकांकडून विघातक कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबी काही वेगळे प्रश्न निर्माण करणाऱ्या ठरू शकतात हे लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आहे. भिकारी व गर्दुल्यांचा वावर राहिल्यास गर्दीत भुरटय़ा चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते. पर्वणी काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, लुटमारीसह भुरटय़ा चोऱ्यांवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी पंचवटी पोलिसांनी जादा कुमक मागवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिकारी हटाव अभियान राबविले.
सोमवारी दुपारी ११ नंतर कुठलीही पूर्वसुचना न देता पंचवटी पोलिसांचा फौजफाटा गोदा घाटावर धडकला. यावेळी कोपऱ्यात बसलेले रिकामटेकडे, गांजा चिलिम फुंकणारे गर्दुले, पुलाचा आसरा घेत छोटेखानी संसार मांडलेले लोक, भिकारी यांना हटकण्यात आले. त्यांची किरकोळ चौकशी करून त्यांना पोलीस वाहनात बसविण्यात आले.
दुसरीकडे, मंदिराच्या पायथ्याशी, मोकळ्या आवारात, घाटाच्या बाजुने झोपलेले किंवा झोपेचे सोंग घेतलेल्यांच्या अंगावर पाणी ओतून त्यांना शुध्दीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. काहींनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दंडुक्याचा प्रसादही मिळाला. काहींना जबरदस्तीने पकडून गाडीत टाकण्यात आले. जवळपास दोन ते तीन तास ही मोहीम सुरू होती.
या धडक मोहिमेत १०० हून अधिक भिकारी, नशेबाजांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांची नावे, ते कुठून आले याबद्दल विचारणा करत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. काहींना पुन्हा घरी जा तर काहींना गंगेवर पुन्हा दिसता कामा नये अशा दम भरत त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
काही भिकारी दुर्धर आजार किंवा संसर्गजन्य आजाराने बाधीत झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. नजीकच्या काळात मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास ही मोहीम पुन्हा प्रभावीपणे राबविली जाईल असे अवसरे यांनी सांगितले.हे तर महापालिकेचे काम
गोदा काठावर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि प्रशासनाने ही मोहीम राबविणे गरजेचे आहे. मात्र पोलीस यंत्रणेने पुढाकार घेत आपले काम बजावले. गोदा घाटावरील व्याधीग्रस्त भिकाऱ्यांना उचलले तरी बरेचसे काम नियंत्रणात येईल.
शांताराम अवसरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी)