अन्न, वस्त्र, निवारा या मानवी मुलभूत गरजा सर्वानाच माहिती आहे, पण आरोग्य ही सुद्धा प्रत्येकाची मुलभूत गरज आहे, याची जाणीव फार थोडय़ा लोकांना आहे. आरोग्याच्या अधिकारावर सर्वाचाच हक्क आहे आणि तो हक्क मिळावा म्हणून ‘राईट टू हेल्थ’ या मोहिमेची सुरुवात जागतिक आरोग्य दिनापासून केली जात आहे. पद्मश्री डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मोहिमेला नागपुरातील काही सायकल ग्रुपने साथ दिली आहे.
सर्वसाधारण लोकांमध्ये नैराश्याच आलेख झपाटय़ाने वर जात असून तो २२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. प्रामुख्याने युवकांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या नैराश्याला वेडसरपणाचे नाव देऊन आरोग्याच्या व्याख्येतून त्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याच मानसिक आरोग्यावर आयुष्य अवलंबून असल्याने ही मानसिकता बळकट करण्यासाठी ‘राईट टू हेल्थ’ ही मोहीम प्रभावी ठरणार आहे. एकदा जन्म झाल्यानंतर नव्हे, तर बाळ पोटात असल्यापासूनच तो आरोग्याच्या अधिकारास पात्र आहे. सरकारने गरजू लोकांच्या आरोग्यासाठी अनेक योजना सुरू केल्या खऱ्या, पण खरच त्या गरजूंपर्यंत पोहोचतात का, याचे उत्तर नकारात्मक आहे. आरोग्याची जाणीव आणि ज्ञानाअभावी या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात आरोग्याच्या अनेक गोष्टी उल्लेखित आहेत, पण त्याचे पालन किती केले जाते, हा वादाचा मुद्दा आहे. या मार्गदर्शक तत्त्वानुसार आरोग्याच्या अर्थसंकल्पात दरडोई उत्पन्न (जीडीपी) ९ टक्के असायला हवे. अमेरिका आणि इतर देशात तो १० ते १५ टक्के आहे. भारतात मात्र तो केवळ ४ ते ५ टक्केच असणे अतिशय चिंतेची बाब आहे. निरोगी मानवी संसाधनाचे महत्त्व लक्षात घेऊनच सरकारने दीर्घकालीन दृष्टीकोनातून उपाययोजना आखायला हवी. आरोग्याचा परिणाम आयुष्यावर होतो, पण आजारामुळे कामाचे कितीतरी तास गमावले जातील? अशा वेळी देशाचे आर्थिक नुकसान तर होईलच, पण राष्ट्रीय हानीसुद्धा तेवढीच होईल, याचा विचार कुठेही केला जात नाही.
आरोग्य चांगले असेल तर नैराश्याचा प्रादुर्भाव कमी होईल. याच कारणांमुळे मानसिक बळकटीकरणासाठी ‘राईट टू हेल्थ’ ही मोहीम आखण्यात आली, असे पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

५ एप्रिलला मोहिमेचा शुभारंभ
जागतिक आरोग्य दिनानिमित्त रविवार, ५ एप्रिलला या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजता सायकल रॅली आणि पदयात्रा आयोजित केली आहे. ‘आरोग्याचा अधिकार’ या विषयावर सायंकाळी ५.३० वाजता सिव्हील लाईन्समधील चिटणवीस सेंटरमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, विविध मान्यवर यात सहभागी होणार आहेत.