महापालिकेची जबाबदारी आपल्याकडे प्रभारी स्वरुपात आहे. पूर्णवेळ आयुक्त नियुक्त होईपर्यंत शासनाने तात्पुरत्या स्वरुपात केलेली ही व्यवस्था आहे. या स्वरुपात कार्यभार सांभाळताना आयुक्तांनी मोठय़ा कामांना मंजूरी देणे अपेक्षित नाही. जी कामे निकडीची आहेत, त्यांना मंजूरी देणे अभिप्रेत आहे. विभागप्रमुखांनी प्राधान्यक्रमानुसार दिलेली, सिंहस्थासाठीची तसेच काही नगरसेवकांच्या कामांच्या फाईल्सवरही आपण स्वाक्षरी केली आहे. विकास कामांच्या फाईल्सवर स्वाक्षरी करताना आर्थिक बाजुचांही विचार करावा लागतो. सद्यस्थितीत महापालिकेचे ४६५ कोटींचे दायित्व आहे. आर्थिक बाजू आणि कामांची अनिवार्यता यांचा विचार करून आपण फाईल्सवर स्वाक्षरी करत असल्याचे प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी ‘नाशिक वृत्तांन्त’ला सांगितले.महापालिकेचा कार्यभार स्वीकारुन आपणास जेमतेम १५ दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यातील सुटीचे दिवस वगळता आठ ते नऊ दिवस आपण नियमितपणे काम करत आहोत. मागील काही महिन्यांपासून प्रभारी आयुक्तांकडे पदभार असल्याने फाईल्सची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण विभाग प्रमुखांना विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची सूचना केली. त्या प्राधान्यक्रमानुसार फाईल्सला मंजुरी दिली जात आहे. सिंहस्थाची कामे विहित मुदतीत पूर्णत्वास जाणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने सिंहस्थाच्या कामांना मंजुरी दिली. त्यानंतर जी निकडीची कामे आहेत, त्या फाईल्सवरही स्वाक्षरी करत आहे. नगरसेवकांच्या फाईल्सही हाती घेण्यात आल्या आहेत. कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करताना आर्थिक बाजुचा विचार करावा लागतो. प्रभारी आयुक्त म्हणून आपण महापालिकेचे दायित्व किती वाढवावे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. काही फाईल्सवर लेखा विभागाने नकारात्मक शेरा दिला आहे. म्हणजे एखाद्या कामावर आधीच बराच निधी खर्च झाला आहे. तरतुदीपेक्षा अधिक खर्च झाला असताना संबंधित कामासाठी निधी देऊ नये असे लेखा विभागाचे म्हणणे आहे. लेखा विभागाचा नकारात्मक शेरा असताना आपण स्वाक्षरी करणे उचित नाही. नियमानुसार आणि निकडीच्या कामांना मंजुरी देणे आपली जबाबदारी आहे, असे पोंक्षे यांनी म्हटले आहे.