गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता दिसत नसली तरी प्रचंड मंदीमुळे थंडावलेल्या बांधकाम व्यवसायाला झळाळी देण्यासाठी बडे समूह पुढे सरसावले आहेत. संयुक्त भागीदारी करून या समूहांनी बांधकाम क्षेत्रात पाय रोवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटचा मानला जाणारा अदानी समूह तसेच टाटा हाऊसिंग, व्ही रहेजा आदी बडे समूह सध्या आघाडीवर आहेत.
भायखळा येथील खटाव मिलचा विकास करणाऱ्या मॅरेथॉन ग्रुपने ‘मॉन्ट साऊथ’ या जुळ्या आलिशान निवासी संकुलासाठी अदानी समूहासह संयुक्त भागीदारी केली आहे. दोन व तीन बीएचके सदनिकेची किमान किंमत चार कोटींच्या घरात आहे.
भायखळा परिसरात अदानी- मॅरेथॉन ग्रुपचे भले मोठे प्रवेशद्वार आकर्षून घेते. मे. स्वयम् डेव्हलपर्स या नावे या प्रकल्पासाठी परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या भूखंडापैकी काही भाग पालिकेच्या मालकीचा आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागाने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले नसले तरी पालिकेने अंशत: परवानगी देऊन टाकली आहे. या प्रकल्पासाठी जाहिरात करून काही सदनिकांची विक्रीही करण्यात आली आहे.
अंधेरी पूर्वेला गुंदवली परिसरात विजय रहेजा आणि असोसिएटस् आणि ओमकार रिअ‍ॅलिटी यांच्यात संयुक्त भागीदारी प्रकल्प दिमाखात उभा राहत आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या प्रकल्पात जागेचे मालक रहेजा आहेत आणि त्यावर ओमकार रिअ‍ॅलिटी प्रकल्प उभारत आहेत. दोन व तीन बीएचके सदनिकेची किमान किंमत पावणेदोन कोटी आहे.
ओमकार रिअ‍ॅलिटीसाठी लार्सन अँड टुब्रो बांधकाम कंत्राटदार आहेत तर काही ठिकाणी त्यांच्यासोबत भागीदारीही आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात असलेल्या ओमकार रिअ‍ॅलिटीने ‘एल अँड टी’कडून पुनर्वसनाची घरे बांधून घेतली आहेत.
मुलुंड पूर्वेला द्रुतगती महामार्गानजीक म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पात रिचा रिअ‍ॅलटॉर्ससोबत टाटा हाऊसिंगने संयुक्त भागीदारी करून ‘गेटवे टॉवर्स’ची उभारणी सुरू केली आहे. या प्रकल्पाचीही जाहिरात देण्यात आली असून या सदनिकेची किमान किंमत दोन कोटींच्या घरात आहे. माहुल येथील आठ ते नऊ वसाहतींच्या पुनर्विकासात विलेपार्ले येथील सदगुरु बिल्डर्सने संयुक्त भागीदारी केली आहे.
अंधेरी पश्चिमेतील न्यू डी. एन. नगर पुनर्विकास प्रकल्पात सुरुवातीला मे. वैदेही आकाश हाऊसिंग प्रा. लि. सोबत रुस्तमजीने संयुक्त भागीदारी केली होती. परंतु नंतर हा प्रकल्प रुस्तमजीने ताब्यात घेतला. रुस्तमजी आल्यानंतर या प्रकल्पाचे काम जोरात सुरु झाले आहे.

संयुक्त भागीदारीतील काही प्रकल्प
व्ही. रहेजा आणि ओमकार रिअ‍ॅलिटी : गुंदवली, अंधेरी पूर्व
अदानी समूह आणि मॅरेथॉन ग्रुप : खटाव मिल, भायखळा
रिचा रिअ‍ॅलटॉर्स – टाटा हौसिंग : मुलुंड, म्हाडा वसाहत  

शासनाच्या धोरणामुळे अनेक बिल्डरांचे विशेषत: पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. या काळात रहिवाशांच्या भाडय़ापोटी लाखो रुपये बिल्डरांना खर्च करावे लागले आहेत. त्यामुळे दिवाळखोरीत गेलेल्या या बिल्डरांना अर्थसहाय्यासाठी संयुक्त भागीदारीत सामील व्हावे लागत आहे
    -मिलिंद गोरक्ष,  वास्तुरचनाकार.