मुंबईतल्या झोपडपट्टय़ांमधील शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याची योजना या स्वातंत्र्यदिनी प्रत्यक्षात येणार असून त्याचे धारावी येाील एका शाळेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या योजनेंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीतल्या ५०० शाळांमध्ये बायोटॉयलेट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुंबईतील, विशेषत: झोपडपट्टय़ांमधील शाळांमध्ये स्वच्छता गृह आणि पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी शासनातर्फे ३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून शहरातील ५०० हून अधिक शाळांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. या योजनेद्वारे पारंपरिक पद्धतीचे आणि प्री फॅब्रिकेटेड स्वच्छतागृहे देण्यात येणार आहेत.
या स्वच्छता गृहातील टाक्यांमध्ये असे काही जीवाणू सोडलेले असतात की जे मैला तेोच नष्ट करतात आणि त्यातील पाणी स्वच्छ करून बाहेर सोडतात. हे पाणी बागा किंवा अन्य कामांसाठी वापरता येणे शक्य होणार असल्याचे या योजनेची मागणी करणारे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. धारावीतील गणेश विद्यामंदिर शाळेत पहिल्या बायोटॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. आता पहिल्या टप्प्यात मुंबई आणि उपनगरातील ३६ शाळांमध्ये हे टॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. यानंतर पुढील सहा महिन्यात मुंबईतील सर्व शाळांचा या योजनेत समावेश होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांसाठी ‘कॅशलेस’ आरोग्य योजना
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ‘कॅशलेस’ आरोग्य योजना पुरविली जाते. त्याच आधारावर शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबीयांनाही ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षण हक्क कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन केली आहे. ही योजना कशी राबविली जावी याचा तयार आराखडाही शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्यवाह सुभाष मोरे यांनी यावेळी सादर केला आहे.