कोणत्याही विद्यापीठाचे संशोधनातील योगदान, त्याचा समाजजीवनावरील परिणाम, विद्यापीठात निर्माण झालेले दर्जात्मक मनुष्यबळ हीच कोणत्याही विद्यापीठाची खरी ओळख असते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी केले.
डॉ. वेंकटेश्वरलू यांनी विद्यापीठ कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला, त्यानिमित्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित सत्कारात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी उपसंचालक डॉ एस. बी. वराडे, तर व्यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. विश्वास िशदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व कुलसचिव काशिनाथ पागिरे यांची उपस्थिती होती.
डॉ. वेंकटेश्वरलू म्हणाले, की शेतकऱ्यांच्या विद्यापीठाकडून अनेक अपेक्षा आहेत. परंतु आपणास प्राधान्यक्रम ठरवावे लागतील व त्या दिशेने काम करावे लागेल. विद्यापीठाची बलस्थाने व कमतरता याचा विचार करून, बलस्थानाच्या जोरावर येणाऱ्या काळात एक एक वीट रचून विद्यापीठास देशातील उत्कृष्ट विद्यापीठाचा मान मिळविण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू. डॉ. वराडे म्हणाले, की आपणाकडे अनेक कल्पना असतात. परंतु त्यातील एकाच गोष्टीवर पूर्णपणे लक्ष देऊन कार्य करावे लागेल. अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या परिस्थितीशी निगडित तंत्रज्ञानाची गरज असून, काटेकोर शेती संशोधनावर विद्यापीठास भर द्यावा लागेल. डॉ. आशा आर्या यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. बी. भोसले यांनी आभार मानले.