मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा, विरंगुळा म्हणून फिरता यावे यासाठी पालिकेने अत्यंत देखणी अशी उद्याने साकारली आहेत. आता पालिकेने चिमण्या, बुलबुल यांच्यासाठी ‘पक्षी उद्यान’ साकारावे, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.
कुर्ला (पू.) येथील व्ही. एन. पुरव मार्गावरील प्रियदर्शनी संकुलाजवळील ‘सह्याद्रीतील दुर्ग आणि वनस्पती उद्याना’चा लोकार्पण सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘सह्याद्रीतील दुर्ग आणि वनस्पती उद्याना’च्या जागी पूर्वी कचरा टाकण्यात येत होता. पालिकेने रहिवाशांची गरज आणि जागेचे महत्त्व लक्षात घेऊन येथे आकर्षक असे उद्यान साकारले आहे. अत्यंत दुर्मिळ वनस्पती या उद्यानात पाहता येतील. मुंबईकरांसाठी जितके अभिनव करता येईल, ते पालिकेने करावे.
सुमारे ६.५ एकर जागेतील या उद्यानात सह्याद्रीतील शिवनेरी, पुरंदर, कुलाबा (जलदुर्ग) अशा शिवकालीन दुर्गाची प्रतिकृती साकारण्यात आल्या असून सह्याद्री पर्वतराजींतील वनस्पतींच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभास उपमहापौर अलका केरकर, माजी मंत्री लीलाधर डाके, रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आदी मान्यवर उपस्थित होते.