दर दहा मलांवर बोलीभाषा बदलते आणि त्यामुळे त्यातील संदर्भशब्दही. मग मूळ भाषा मराठीच असली तरी भारद्वाजला कोकणात कुक्कुडकोंबा बोलले जाते तर कोल्हापूर-बेळगावात रतनपक्षी. ‘धनेश’ या संस्कृत नावाने परिचित असलेल्या पक्ष्याला रत्नागिरीत गरुड, सिंधुदुर्गात माडगरुड तर दापोली-मंडणगडमध्ये ककणेर अशी नावे आहेत. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या माळढोक पक्ष्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात त्याला ‘हूम’ नावाने ओळखतात. ही नावे व भाषावैविध्य टिकवायलाच हवे, पण त्याचबरोबर शास्त्रीय लिखाणासाठी त्यांची प्रमाण नावे ठरवणेही आवश्यक असल्याने ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने पक्ष्यांच्या मराठी नावांचे प्रमाणीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
भाषेचे प्रमाणीकरण हा वादाचा मुद्दा राहिला असला तरी स्थानिक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत अचूक अर्थाने पोहोचवण्यासाठी ते आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील बोलीभाषेतील वैविध्यांमुळे पक्षी व प्राण्यांची स्थानिक नावेही बदलतात. पुढील वर्षांच्या पक्षीमित्र संमेलनात पक्ष्यांच्या प्रमाण नावांची अंतिम यादी सादर करण्यात येणार आहे. पक्ष्यांसाठी प्रमाण नावे सुचवण्यासाठी संस्थेने पक्षीमित्रांना आवाहन केले आहे.
जगभरात एकाच इंग्रजी प्रमाणनावाने पक्षी ओळखले जात असताना राज्यातही मराठीतील प्रमाणनावे असणे आवश्यक आहे हे लक्षात आले. महाराष्ट्रातील पक्षीमित्रांना एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करताना सोपे व्हावे तसेच पक्ष्यांच्या विविध नावांमुळे होणारा गोंधळ कमी व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. डॉ. मारुती चितमपल्ली यांचा पक्षीकोष, डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे व निरंजन संत यांचे ‘बर्ड इन महाराष्ट्र’ आणि ‘बीएनएचएस’चे ‘दक्षिण भारतातील पक्षी’ या तीन पुस्तकांचा आधार घेण्यात आला आहे, अशी माहिती ही नावे संकलित करणाऱ्या डॉ. राजू कसंबे यांनी दिली.
स्थानिक तसेच स्थलांतरित असे साधारण साडेपाचशे पक्षी राज्यात आढळतात. डॉ. कसंबे यांनी तब्बल ५४८ पक्ष्यांची नावे संकलित केली आहेत. ही सूची http://www.bnhs.org व http://www.commons.wikimedia.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. पक्षीमित्रांनी ही नावे पाहून raju.bnhs@gmail.com  यावर मते, पक्ष्यांची नावे  पाठवावीत.
निकष :-
* पक्ष्याच्या गोत्राचे (जीन्स) योग्य नाव ठरविले जावे; उदा. करकोचा (स्टॉर्क) – त्याच्या सर्व प्रजातींसाठी. त्यामुळे क्रौंच (क्रेन) जातीतील पक्ष्याला बोलीभाषेत करकोचा ठरवलेले नाव रहित केले जावे.
* पक्ष्याच्या प्रजातीनुसार त्याचे नाव ठरविले जावे; उदा. ब्लॅक स्टॉर्कसाठी काळा करकोचा. शास्त्रीय नावाचा अर्थ समजून घेऊन व तर्क वापरून मराठी नाव तयार करावे.
* नावे शक्यतो प्रचलित मराठीत असावीत. चक्रवाक (रुडी शेलडक) सारखी रुळलेली संस्कृत नावे असली तरी चालेल, परंतु अप्रचलित कठीण संस्कृत नावे नसावीत. िहदीतील नावे सुद्धा शक्यतो टाळावीत. काही खूपच रुळलेली िहदी नावे कंसात ठेवली जाऊ शकतात; उदा. पारवा (कबुतर).
* सामान्यपणे वापरत असलेली, परंतु अर्थ स्पष्ट न करणारी नावे टाळावीत. उदा. खंडय़ा (किंगफिशर) हे नाव प्रसिद्ध असले तरी त्याला फारसा अर्थ नाही. त्याऐवजी मासे खात असल्याने कोळ्यांसाठी वापरले जाणारे ढिवर हे नाव या पक्ष्याला देता येईल. त्याच्या इतर प्रजातींसाठी पांढऱ्या छातीचा ढिवर, काळ्या टोपीचा ढिवर असे नाव असू शकेल.
* अडचण वाटल्यास पक्ष्याच्या आवाजावर किंवा सवयीवर आधारित नावे ठेवावीत; उदा. गुंडूर बटलावा –  त्याच्या डुरडुरणाऱ्या आवाजावरून.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!