THANE1महानगरातले वास्तव्य आणि निसर्गाचे सान्निध्य या दोन परस्परविरोधी घटकांची आस मनी बाळगणारी शहरी माणसं काँक्रीटच्या जंगलातही मिळेल त्या जागी आपापल्या परीने हिरवाई जपण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच प्रकारे निसर्गाविषयी मनात असणारी कमालीची आस्था आणि कुतूहलापोटी नवे ठाणे म्हणून नावारूपाला आलेल्या घोडबंदर रोड परिसरातील एका गोजिरवाण्या घरात गेले वर्षभर चक्क निरनिराळ्या पक्ष्यांची शाळा भरू लागली आहे.
शहरी भागातील पक्षी म्हटले की कावळा, चिमणी, साळुंकी, पोपट या पलीकडे फारसे काही आठवत नाही. मात्र ब्रह्मांड सोसायटीत राहणाऱ्या सीमा राजेशिर्के यांना मात्र बाल्कनीतून दिसणाऱ्या हिरवाईत चक्क साठहून अधिक प्रकारचे पक्षी आढळले आहेत. त्यातील चाळीसहून अधिक पक्षांची त्यांनी छायाचित्रेही घेतली आहेत. राजेशिर्के कुटुंब चौथ्या मजल्यावर राहतात. त्यामुळे त्यांच्या बाल्कनीतून पलीकडच्या झाडा-झुडपातील पक्ष्यांचे चांगल्या पद्धतीने निरीक्षण करता येते. या कुटुंबातील सर्वजण निसर्गप्रेमी आहेत. त्यामुळे सहाजिकच खिडकीवाटे दिसणाऱ्या आणि ऐकू येणाऱ्या किलकिलाटावर येता-जाता त्यांचे लक्ष असते. असे केवळ पाहात बसण्यापेक्षा त्यांची नोंद करावी म्हणून सीमा राजेशिर्के यांनी गेल्या वसंत ऋतूपासून त्यांची छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. त्यांचे पती शेखर राजेशिर्के हौशी गिर्यारोहक आहेत. त्यांच्याकडून छायाचित्रणाचे जुजबी प्रशिक्षण घेऊन त्यांनी विंडोबर्डिग सुरू केले.
पक्ष्यांचा पाहुणचार
कावळा, चिमणी, कबूतर, पोपट या नेहमी आढळून येणाऱ्या पक्ष्यांबरोबरच इतर विविध पक्षीही त्यांना आढळून आले. चिमणीसारखाच दिसणारा, पण थोडा मोठा असलेला पांढऱ्या गालाचा बुलबुल पावसाळ्यात दिसला. धनेश, रेड व्हिस्कर्ड बुलबुल, रेड व्हेंटेड बुलबुल, निरनिराळ्या प्रकारचे पोपट आपल्या संकुलात नियमितपणे येतात, हे त्यांना या निरीक्षणातून समजले. त्यात काही स्थलांतरित पक्षीही आहेत. खिडकीच्या पलीकडून एका डोळ्याने सतत निरीक्षण करणारी ही मंडळी आपल्याला नक्कीच इजा अथवा दगा-फटका करणार नाहीत, इतपत विश्वास निर्माण झाल्यावर अनेक पक्ष्यांनी लोखंडी गजांची लक्ष्मणरेषा ओलांडून आता थेट राजेशिर्के यांच्या घरात येण्यास सुरुवात केली. आई-वडिलांप्रमाणेच मुलगी वसुंधरा आणि मुलगा परम दोघेही वन्य जीवांविषयी आस्था बाळगणारे असल्याने या घरातील सर्व खिडक्या पक्ष्यांसाठी सदैव खुल्या असतात. दीड वर्षांच्या निरीक्षणानंतर सर्वच पक्षी आवडीने केळी खात असल्याच्या निष्कर्षांप्रत राजेशिर्के कुटुंबीय आले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात पक्ष्यांच्या पाहुणचारासाठी सदैव केळी आणून ठेवलेली असतात. दिवसभर निरनिराळे पक्षी त्यांच्यासाठी विशिष्ट ठिकाणी ठेवलेल्या केळ्यांवर ताव मारत असतात. अगदी रात्री एखादे वटवाघुळही बाल्कनीत डोकावून तिथे ठेवलेलं केळं फस्त करते, अशी माहिती सीमा राजेशिर्के यांनी दिली.
पक्ष्यांची सोयरिक पाहण्याची संधी
सीमा राजेशिर्के यांचे गेल्या सव्वा वर्षांत त्यांच्या घरातून काढलेल्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन कापूरबावडी येथील ठाणे कलाभवन येथे २१ ते २३ नोव्हेंबर रोजी भरविले जाणार आहे. या छायाचित्रांबरोबरच त्यांच्या या पक्षी निरीक्षणाच्या छंदावर आधारित ‘विंडोबर्डिग’ हा अध्र्या तसाचा माहितीपटही त्यांनी तयार केला आहे. प्रदर्शन काळात हा माहितीपटही दररोज संध्याकाळी दाखविला जाईल. एका महानगरीय कुटुंबाने पक्ष्यांशी केलेली ही सोयरिक पाहण्याची संधी रसिकांना यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.