मावळत्या वर्षांला अलविदा करतानाच नववर्षांच्या स्वागताच्या जल्लोषाचे बेत आखण्यात सध्या सर्वच जण मश्गुल आहेत. नाच-गाण्याबरोबरच चोखंदळ खवय्यांनी चिकम, मटणाबरोबरच खमंग भरले वांगे, उंधयोचाही बेत आखला आहे. तर काहींनी जायनीजला पसंती देत हॉटेल आणि केटर्सकडे ऑर्डर दिल्या आहेत. मात्र वाढत्या महागाईमध्ये खिशाला परवडेल याची काळजी घेत बेत आखले जात आहेत.
सरत्या वर्षांला निरोप देत नववर्षांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी बार-रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा पसंतीचे पदार्थ ऑर्डर देऊन तयार करून घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. महागाईच्या काळात पब-बारमध्ये जाऊन मौजमजा करणे खिशाला परवडत नसल्यामुळे इमारतीच्या गच्चीवरच ‘थर्टी फर्स्ट’ची रात्र जागविण्याचा,अथवा एखाद्याच्या घरी जमून नववर्षांचे स्वागत करण्याचे बेत मित्रपरिवारांनी आखले आहेत. जेवणासाठी किलोच्या प्रमाणात चमचमीत मटण वा चिकनची ऑर्डर केटररकडे दिली जात आहे. घरगुती पद्धतीने मांसाहारी पदार्थ बनवून देणाऱ्या पोळी-भाजी केंद्रांकडे, खाणावळींकडे अर्धा किलोपासून एक-दोन किलोपर्यंत मटण वा चिकनच्या ऑर्डर जात आहेत. शिवाय बहुतांश लोक हे आयत्यावेळी प्लेटच्या हिशेबाने पदार्थ नेत असल्याने मांसाहारी पदार्थ देणाऱ्यांनी त्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
बिर्याणीलाही या दिवशी मोठी पसंती असते. त्यासाठी आपापल्या भागातील प्रसिद्ध ‘बिर्याणी’वाल्यांकडे ऑर्डर नोंदवण्यात येत आहेत. पार्टीला किती लोक येणार याचा अंदाज घेऊ त्यानुसार किलोच्या हिशेबात बिर्याणीची ऑर्डर दिली जात आहे. मटण बिर्याणीपेक्षा चिकन बिर्याणीला अधिक मागणी आहे. एरवी रोज २०-२५ किलो बिर्याणी खपते, पण या दिवशी साधारणपणे ५० किलो बिर्याणी प्लेटच्या हिशेबाने जाते. शिवाय एक-दोन किलोच्या साधारण १५-२० ऑर्डरही असतात, असे डोंबिवलीतील एका बिर्याणी विक्रेत्याने सांगितले. तर नेहमीपेक्षा या दिवशी ५०-६० टक्क्यांपेक्षा जास्त बिर्याणीची मागणी असते, अशी माहिती कुलाबा येथील ‘दिल्ली दरबार’च्या व्यवस्थपकाने दिली. मटण-चिकनबरोबरच मत्स्यप्रेमींमध्ये या दिवशी नेहमीच्या माशांशिवाय जिताडय़ाची पार्टी करण्याचे बेत आखले जात आहेत.
मांसाहारी मंडळींसाठी चिकन-मटण, माश्यांचे बेत आखले जात असताना शाकाहारींनी पावभाजी, उंधयोच्या ऑर्डर नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यंदा ३१ डिसेंबर सोमवारी आहे. बहुतांश ठिकाणी सुरती उंधयो हा रविवारी मिळतो. पण ३१ डिसेंबरसाठी अनेक जण उंधयोची मागणी नोंदवत असल्याने सोमवारीही उंधयो देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. सुमारे २५० ते ३०० रुपये प्रति किलो या दराने उंधयो मिळत आहे.

नेहमी मुबलक प्रमाणात मिळणारा साधा पावही ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी दुर्मिळ होतो. कोणी पावभाजीसाठी तर कोणी चिकम, मटणाच्या रश्श्यासोबत पाव खातो. आयत्यावेळी अनेक ठिकाणी पाव संपलेला असतो. त्यामुळे अनेक बेकऱ्यांमध्ये पावाची आगाऊ नोंदणी सुरू केली आहे. अनेक सोसायटय़ांमध्येही या दिवशी पार्टी असते. त्यामुळे तीन-चार लाद्यांपासून ते अशा मोठय़ा पार्टीसाठी ३००-४०० लादी पावाची नोंदणी सुरू झाली आहे, असे बेकरीचालकांकडून सांगण्यात आले.