सुमारे १५ वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात सत्तेत आलेल्या भाजप नेत्यांभोवती सध्या बिल्डरांचा विळखा पडला आहे. या विळख्यातून हे मंत्रीपदी असलेले नेते बाहेर पडतात की त्यात आणखी गुरफटत जातात, याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.
अलीकडच्या काही दशकात राज्यात सत्ताकेंद्र आणि बिल्डर, असे नवे समीकरण प्रस्थापित झाले आहे. जमीनजुमला आणि इमारत बांधणीचा व्यवसाय करणे यात काही गैर नाही. मात्र, नियमांना फाटा देऊन किंवा फायद्यासाठी कायदे वाकवून व्यवसाय करणे मात्र चुकीचे आहे. राज्यभरातील बहुतांश बिल्डर्स ही चुकीची पद्धत वापरतात. त्यासाठी त्यांना सत्ताकेंद्राच्या भोवती घुटमळत राहावे लागते. या शहरातील बिल्डर्स सुद्धा त्याला अपवाद नाहीत. गेली १५ वर्षे या शहरातील बिल्डर्सची लॉबी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांभोवती फिरत असल्याचे अनेकदा दिसायचे. आता मात्र या लॉबीने चक्क ‘यू-टर्न’ घेतला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात विदर्भातील केवळ दोन मंत्री आहे. त्यापैकी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री आहेत. याशिवाय, दिल्लीत सत्तेत असलेले नितीन गडकरी केंद्रीय दळणवळणमंत्री, तर चंद्रपूरचे हंसराज अहीर रसायन व खत खात्याचे राज्यमंत्री आहेत. लालदिवा मिळाल्यानंतर प्रथमच विदर्भात आलेल्या या चारही मंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरातील बिल्डर्स लॉबीने वारेमाप खर्च केला. यापैकी गडकरींचा स्वागत सोहळा आता विस्मृतीत गेला आहे. मात्र, उर्वरित तीनही नेत्यांच्या स्वागतासाठी शहरातील या लॉबीने अजिबात कसर ठेवली नसल्याचे पदोपदी जाणवले.
काही वषार्ंपूर्वी हे बिल्डर नेत्यांचे समर्थक अथवा कार्यकत्यरंना समोर करून त्यांच्या माध्यमातून स्वागताचा खर्च करायचे. बिल्डरांची तेव्हाची भूमिका केवळ ‘सौजन्यापुरती’ असायची. यावेळी मात्र या बिल्डरांनीच स्वत:ची मोठमोठी छायाचित्रे वापरून व त्यात मंत्र्यांचा समावेश करून स्वागत केले. हा बदल या शहराने यावेळी प्रथमच अनुभवला. शहरभर मोठे फलक, माध्यमातील जाहिराती एवढय़ावरच ही लॉबी थांबली नाही, तर स्वागताच्या वेळी, तसेच प्रत्येक कार्यक्रमात मंत्र्यांसोबत कसे राहता येईल, याचीही काळजी या लॉबीतील प्रत्येकाने घेतली. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते बाजूला आणि हे बिल्डरच समोर, असेच चित्र या मंत्र्यांच्या शहरातील वास्तव्याच्या काळात नेहमी बघायला मिळत आहे. मंत्री हंसराज अहीर व सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र चंद्रपूर आहे. त्यामुळे या शहराशी त्यांचा फार संबंध नाही. मात्र, या दोघांचे सर्वात जास्त फलक चंद्रपूरपेक्षा नागपुरात लागले. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील नामवंत बिल्डर्स हातात जाहिराती असलेल्या वृत्तपत्रांचे गठ्ठे घेऊन विमानतळावर हजर असल्याचे बघायला मिळाले.
राज्याचे मुख्यमंत्री व या शहरातील आमदार देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण कधीच बिल्डरधार्जिणे राहिले नाही. कायम लोकांचे प्रश्न सोडविण्यात व्यस्त असलेल्या या नेत्याभोवती सुद्धा पहिल्या स्वागताच्या वेळी बिल्डरांचा गराडा पडलेला दिसला.
मुख्यमंत्रीपदाचा मान या शहराला मिळाला म्हणून या शहरातील सर्वच घटकांना आनंद झाला तसा तो बिल्डरांना झाला आणि त्यातून त्यांनी स्वागत केले तर त्यात गैर काय, असा युक्तिवाद असू शकतो. तो मान्यही करता येण्यासारखा आहे. मात्र, जिकडे सत्ता जाईल तिकडे घडय़ाळाचा काटा फिरविणारे बिल्डर केवळ या एका भावनेतून मंत्र्यांभोवती घुटमळत आहेत काय, या प्रश्नात या विळख्याचे सारे मूळ सामावले आहे.  
 अलीकडेवेगाने वाढत असलेल्या या शहरातील गुन्हेगारीत झालेली वाढ हा सध्या चिंतेचा विषय आहे. जमीन व्यवसाय व त्यातून उद्भवणारी स्पर्धा सुद्धा या गुन्हेगारीला कारणीभूत असल्याचे पोलिसांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. जमिनीचे वाद सोडविण्यात सराईत असलेल्या अनेक टोळ्या या शहरात आहेत. त्यांना कुणाचे संरक्षण आहे, हेही सर्वाना ठावूक आहे.
या पाश्र्वभूमीवर मंत्र्यांभोवती पडलेला हा बिल्डरांचा विळखा चिंतेचा विषय ठरतो. त्यामुळे स्वच्छ कारभाराची हमी देऊन सत्तेत आलेले हे मंत्री या विळख्यातून स्वत:ला अलगद सोडवतात की त्यात गुरफटत जातात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ही चिंतेची बाब -मुनगंटीवार
कुणी स्वागतासाठी समोर येत असेल तर त्याला रोखता येत नाही, हे खरे असले तरी आपला गैरवापर होणार नाही, याची काळजी मी घेणार आहे. मंत्र्यांभोवती बिल्डरांचा वावर ही चिंतेची बाब नक्की आहे. पहिल्याच भेटीत मलाही ते जाणवले. केवळ मीच नाही तर पक्षाचे सर्व नेते भविष्यात खबरदारी घेतील, असे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
 विकासासाठी संबंध -क्रेडाई
शहराचा विकास व्हावा, याच हेतूने आमचे सहकारी मंत्र्यांशी संबंध ठेवून असतात. यात अजिबात स्वार्थ नाही. जे सत्तेत असतात त्यांच्याशी चांगल्या हेतूने जुळणे यात काही गैर नाही, असे बिल्डरांची संघटना असलेल्या क्रेडाईचे पदाधिकारी अनिल नायर म्हणाले.