लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील पक्षाची सुकाणू समिती राज्यातील विविध मतदारसंघात जाऊन आढावा घेणार असून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. विदर्भात नागपूरला १४ जुलै तर अमरावतीला १८ जुलैला जिल्ह्य़ांतील समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभेनंतर केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांंमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
महायुतीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावर दावे केल्याने पक्षाची पंचाईत झाली आहे. मुंबईला झालेल्या पक्षाच्या राज्य पातळीवरील प्रमुख कार्यकत्यार्ंच्या बैठकीत यावेळी पक्षाने स्वबळावर निवडणूक लढावावी, अशी इच्छा अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेने सुद्धा तशी मानसिकता करून ठेवली आहे. मात्र, राज्यातील पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय कार्यकारिणी काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विदर्भातील अनेक मतदारसंघ शिवसेनेकडे असताना ते भाजपला मिळावे, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. नागपूरच्या सहा विधानसभा मतदारसंघाशिवाय जिल्ह्य़ातील आठ मतदारसंघात यावेळी काही पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. कोणाला उोदवारी मिळावी आणि कोणाला नाही, याबाबत गणिते मांडली जात आहेत.
दक्षिण नागपूर मतदारसंघ हा शिवसेनेकडे असल्यामुळे तो शिवसेनेला मिळावा यासाठी शिवसेनेचे शेखर सावरबांधे यांनी कंबर कसली आहे तर भाजपच्या काही नेत्यांनी वर्षभरापूर्वीच या मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे या ठिकाणी युतीपैकी जो कोणी उमेदवार राहील त्याच्यासमोर स्वपक्षाचे आव्हान राहणार आहे. अन्य मतदारसंघात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून किमान चार ते पाच उमेदवार रिंगणात असून ते आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून फिल्डींग लावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांची ती खेळी किती यशस्वी होते ते येणाऱ्या दिवसात समजलेच.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, एकनाथ खडसे, पल्लवी मुंडे, सरचिटणीस रवी भुसारी आदी सदस्य बैठक घेऊन प्रत्येक जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. १४ जुलै नागपूरला गणेशपेठमधील पक्षाच्या प्रचार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता बैठकीला प्रारंभ होणार असून त्यानंतर प्रत्येक जिल्ह्य़ातील सुकाणू समितीशी राज्यातील पदाधिकारी चर्चा करून जिल्ह्य़ाचा आढावा घेणार आहे. त्यामुळे उमेदवारी पक्की करण्यासाठी काही पक्षाचे नेत्यांनी सुकाणू समितीमधील सदस्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्यामुळे त्यातील काही नेते या बैठकीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तर भाजपमध्ये प्रवेश करावा या मानसिकतेमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत. दक्षिण पश्चिम, पश्चिम, पूर्व आणि मध्य नागपुरात इच्छुकांची गर्दी आहे. जे प्रस्थापित आमदार आहे त्यापैकी काही आमदारांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली. मात्र, त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.