वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी बाकांवरील नगरसेवकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांना मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातून आता घरचा आहेर मिळाला असून ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा दोन-चार नगरसेवकांचा अपवाद वगळता इतर सर्व सदस्यांना अंधारात ठेवूनच चालवली जात असल्याचा आरोप माजी महापौर मिलिंद पाटणकर यांनी केल्याने युतीच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या दोन महिन्यांत घेण्यात येणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे स्थायी समिती सभापतिपद सोपवून शिवसेना नेते आगामी निवडणुकीसाठी काहीसे निर्धास्त झाल्याचे चित्र आहे. मनसेचे सात नगरसेवक या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात मतदान करणार नाहीत, असा विश्वास शिवसेना नेत्यांना वाटू लागला आहे. असे असताना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी उघडपणे महापौरविरोधी भूमिका मांडल्याने शिवसेनेचे नेते सतर्क बनले आहेत.
महापौरांचा वादग्रस्त कारभार
ठाण्याचे महापौर म्हणून हरिश्चंद्र पाटील यांना गेली सव्वादोन वर्षे आपल्या कामाचा ठोस असा ठसा उमटविता आलेला नाही. सत्ताधारी नगरसेवकांचा एक मोठा गट त्यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराज असून आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांशी संवाद साधण्यात ते कमी पडतात, अशी एकंदर तक्रार आहे. ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेच्या एका प्रतापी आमदाराने आपल्या मतदारसंघातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून मंजूर करून घेतले. घोडबंदर मार्गावर सिटी पार्क उभारणीसारख्या मोठय़ा प्रकल्पांना सर्वसाधारण सभेत हिरवा कंदील दाखविल्यानंतरही त्यासंबंधीच्या ठरावावर स्वाक्षरी करण्यात महापौरांनी वेळकाढूपणा केल्याच्या तक्रारी या आमदाराने जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ िशदे यांच्याकडे केल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, या ठरावावर महापौरांनी स्वाक्षरी करावी यासाठी या आमदाराला स्वत: महापालिकेत खेटे मारावे लागले होते. मध्यंतरी एका शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात त्याला अंधारात ठेवून महापौरांनी शाळेचा शुभारंभ सोहळा उरकला. त्यामुळे या नगरसेवकाने नाराजी व्यक्त करणारे पत्र आयुक्तांना पाठविले.
आता पाटणकरांचे प्रहार
शिवसेना नगरसेवकांचा एक मोठा गट महापौरांच्या कार्यपद्धतीविषयी नाराज असताना आता भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर हरकत नोंदविण्यास सुरुवात केली असून या घरच्या आहेरामुळे शिवसेनेत अस्वस्थता व्यक्त होऊ लागली आहे. ठाणे शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे आवश्यक असताना सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना बोलण्यास वेळ दिला जात नाही, असा थेट आक्षेप पाटणकर यांनी नोंदविला आहे. तहकूब सर्वसाधारण सभेत आयत्या वेळचे विषय आणू नयेत, असा नियम असताना बेकायदेशीरपणे ठराव आणून ते घाईघाईत मंजूर केले जातात, असा आरोप त्यांनी केला आहे. महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते आणि दोन-चार नगरसेवक वगळले तर महापालिकेतील कामकाजाची साधी माहितीही इतर नगरसेवकांना दिली जात नाही, असे तक्रारवजा पत्र पाटणकर यांनी सभागृह नेते नरेश म्हस्के यांना पाठविले असून या पत्रात अप्रत्यक्षपणे महापौरांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. यासंबंधी महापौर पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात संपर्क साधला असता साहेब कार्यालयात नाहीत, असे उत्तर तेथील साहाय्यकाने दिले.