भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत आलेल्या भाजपच्या आश्वासनावर शंका घेण्यास सुरुवात झाली आहे. नीतिमत्ता आश्वासन केंद्राने नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या तीन महिन्यांत केलेल्या कृतीचा अभ्यास करून काढलेला निष्कर्ष धक्कादायक आहे.
गडकरी भाजपचे अध्यक्ष असताना पूर्ती साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला ‘वीज देऊ’ असे हमीपत्र दिले.
पण पूर्तीने वीज मंडळाला वीज दिली नाही. यामुळे मंडळाला इतर स्रोतांकडून महागडी वीज खरेदी करावी लागली आणि मंडळाला ३१ कोटी ३८ लाख रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागला. पूर्तीने नंतर व्याजासह भरपाई
मोबदला दिला. परंतु उद्योग-व्यसाय करताना हमीपत्र देऊन त्याचे पालन न करणे, हा औचित्यभंग झाला, त्याचे निराकरण झाले नाही. यामुळे गडकरी यांनी ‘भ्रष्टाचाराचा इतिहास बदलवून टाकू’ असे २४ मे २०१५ ला कोल्हापूर येथे वक्तव्य केले होते.
त्यांच्या विधानाच्या खरेपणासंबंधी शंका निर्माण होत आहे, असे नीतिमत्ता आश्वासन केंद्राचे संजीव तारे म्हणाले.
वेगळ्या विदर्भाचा प्रश्न संसदेत लावून धरण्याबाबत मी कोणतेही आश्वासन दिले नव्हते, असे गडकरी यांनी त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या लिखित आश्वासनासंदर्भात २८ मे रोजी प्रसार माध्यमांकडे स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी मिहानमध्ये लाखो रोजगार निर्माण करण्यासंदर्भातील केलेले व्यक्तव्यदेखील प्रत्यक्षात आलेले नाही.
मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी प्रयत्न झाल्याचे दिसून आले.
परंतु गुंतवणूक घडवून आणण्यास गडकरी आणि त्यांच्या पक्षाला अपयश आले आहे. गडकरी केवळ खासदार नाहीत तर एक उद्योजक आहेत. त्यामुळे गुंतवणूक कशी होते. ती आणण्यासाठी काय करायला पाहिजे. याबद्दल चांगले ज्ञान आहे. मात्र गेल्या वर्षभरात खासदार म्हणून त्यांना मिहानमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणता आली नाही. मिहानमध्ये उत्पादन कारखाने न आल्याने रोजगाराची निर्मिती देखील झालेली नाही. वर्षभरात दिलेल्या आश्वासन पाळण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात
आले नाही.
केवळ घोषणा करून सातत्याने प्रसिद्धी माध्यमांत राहण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे गडकरी आणि त्यांच्या मार्गदर्शनात राज्यात कार्य करणाऱ्या त्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या कृतीला ८४० पैकी २५० गुण मिळाले आहेत. यामुळे या तिमाहीत गडकरी नागपूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत, असे ते म्हणाले.