पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियानांतंर्गत एकीकडे देशभर स्वच्छता मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे मात्र उपराजधानीत स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गुरुवारी मेयो रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात भाजपच्या अनेक नेते  आणि कार्यकर्त्यांनी केवळ छायाचित्रे काढण्यासाठी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबविल्याचे चित्र दिसून आले.
महात्मा गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला प्रारंभ केल्यानंतर देशभर ही मोहीम राबविणे सुरू केल्यानंतर जिल्ह्य़ात आणि शहरात महापालिका आणि जिल्हा परिषदेने ही मोहीम हाती घेऊन लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविले. मात्र पुन्हा जैथे परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी देशभर सुशासन दिन साजरा होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मेयो रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एरवी मेयो रुग्णालयात कचऱ्याचे आणि गुराढोराचे साम्राज्य असताना गुरुवारी मात्र नितीन गडकरी येणार असल्यामुळे रुग्णालय परिसरात स्वच्छता करण्यात आली होती. कार्यक्रमाला भाजपचे आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीच स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आल्यानंतर भाजपचे अनेक नेते केवळ छायाचित्र काढण्यासाठी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि लगेच काही मिनिटातच तेथून निघून गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा एकदा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  
शहरातील रस्ते, पाणी, प्रदूषण, वाहतूक व्यवस्था आदी विविध मूलभूत समस्या दूर करून विकास करण्याच्या उद्देशाने महापालिकेने गेल्या पाच वर्षांत लोकसहभागातून आणि प्रशासन पातळीवर अनेक चांगले उपक्रम राबविले असले तरी समस्या मात्र आजही कायम आहेत. शहराचा विकास होत असल्याचा दावा सत्तापक्षाकडून केला जात असताना विरोधी पक्ष नेत्यांनी आणि नागरिकांनी महापालिकेच्या बेताल कारभाराबद्दल आवाज उठवणे सुरू केले आहे. गेल्या काही दिवसात डेग्यूच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ बघता महापालिकेने शहरात सर्वेक्षण केले. मात्र, त्यानंतरही काही भागात अस्वछता दिसून येते. शहरातील अनेक भागात आजही कचऱ्याचे ढीग साचलेलेले दिसून येतात.
स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी ते केवळ छायाचित्रे काढण्यासाठी होते की काय? असा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाला आहे. डेंग्यू आणि मलेरियाची साथ वाढत असताना रोगमुक्त नागपूर करण्यासाठी ‘सुंदर नागपूर स्वच्छ नागपूर’ ही योजना लोकसहभागातून राबविण्यात आली. महापालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक चांगले उपक्रम राबविले.
योजना अंमलात आणल्या. त्याचे देशपातळीवर कौतुक होऊन पुरस्कार मिळाले. मात्र, शहराच्या विकासासोबत स्वच्छतेची समस्या मात्र आजही कायम आहे.