लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि बसपाच्या चिंतन बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा अनुभवण्यासाठी उत्साहाच्या वातावारणात तयारीला लागले आहे. ‘अच्छे दिन’ अनुभवण्याचा आनंद घेण्यासाठी विदर्भातून भाजपचे हजारो कार्यकर्ते दिल्लीला रवाना होणार आहेत, तर काही कार्यकर्ते शहरात जल्लोषाची तयारी करण्यात व्यग्र आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेले नेत्रदीपक यश बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा ‘याचि देही याची डोळा’ बघण्यासाठी विदर्भातून हजारो कार्यकर्ते दिल्लीला जाण्यासाठी तयार आहेत. सामान्य कार्यकत्यार्ंपासून ते विदर्भातील खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रेल्वे आणि विमानाचे आरक्षण केले आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोदिया, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिल्लीकडे जाणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण केले, तर काही खासगी गाडय़ा करून दिल्लीला २५ मे रोजी सायंकाळी रवाना होणार आहेत. दिल्लीला जाणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी करण्याचे काम जिल्हा पातळीवर केले जात असून दिल्लीला त्यांची व्यवस्था कुठे राहील, याबाबत सूचना दिल्या जात आहेत. महापालिकेतील भाजपच्या  अनेक नगरसेवकांनी रेल्वेचे आरक्षण केले असून त्यामुळे २५ आणि २६ मे असे दोन दिवस महापालिकेत नगरसेवकांची अनुपस्थिती राहणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्ह्य़ातील  सर्व खासदार, आमदार, जिल्हा आणि शहर अध्यक्ष, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काही उत्साही कार्यकर्ते २५ मे रोजी सायंकाळी दिल्लीला विमान आणि रेल्वे गाडय़ांनी रवाना होणार आहेत. महापौर अनिल सोले, स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्ता पक्ष नेते प्रवीण दटके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी जाणार आहेत. ज्या ठिकाणी शपथविधी सोहळा होणार त्या ठिकाणी तीन हजार लोक बसण्याची व्यवस्था राहणार असल्याची माहिती मिळाली मात्र, दिल्लीला जाणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी गैरसौय होऊ नये म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी शहरात राहून विजयोत्सव साजरा करावा, अशा सूचना शहराच्या अध्यक्षांकडून दिल्या जात आहेत. दिल्लीला जाण्यासाठी पक्षाकडून अशी कुठलीच व्यवस्था करण्यात आली नसली  तरी काही प्रमुख पदाधिकारी स्वयं खर्चाने दिल्लीला जात असल्याचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी सांगितले. २६ मे रोजी दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वे गाडय़ांची परिस्थिती अशीच असल्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी खासगी गाडय़ांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे.  
 विदर्भातून राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे निश्चित असले तरी अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, चंद्रपूरचे हंसराज अहीर आणि यवतमाळच्या खासदार भावना गवळी यापैकी कोणा दोघांची मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात जल्लोषाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या निराशेचे वातावरण असून प्रत्येक जिल्ह्य़ात पराभवाचे खापर फोडण्यासाठी एकमेकांवर दोषारोपण केले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेसारखी परिस्थिती होऊ नये यासाठी चिंतन बैठका घेतल्या जात असून कार्यकर्त्यांंना विश्वासात घेऊन हिंमत दिली जात आहे.