हंसराज अहिर, चंद्रपूर
nsk05विकासकामांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मतदारसंघावरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. विरूर-गाडेगाव येथे वेकोलीची नवीन कोळसा खाण सुरू करून स्थानिकांना रोजगार व वेकोलीत शेतजमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना योग्य व वाढीव मोबदला मिळाला आहे. ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्यीकरण व सिंचन, रस्ते, रेल्वे व रोजगार निर्मितीची कामे सुरू आहेत. रखडलेली बल्लारपूर-मुंबई ही थेट रेल्वे सुरू झाली आहे.
ग्रामीण भागातही विकासकामे सुरू आहेत. तरीही काही स्थानिक उद्योग बंद पडल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीही आहे. केंद्राचा वर्षभरात एकही मोठा प्रकल्प मात्र मंजूर झालेला नाही. अहिर केंद्रीय राज्यमंत्री तर जिल्ह्य़ातील दुसरे नेते सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे वित्तमंत्री. पण दोघांमधील विसंवाद जगजाहीर आहे. जिल्ह्य़ातील दारूबंदीचे सारे श्रेय मुनगंटीवार यांनी घेतले. उभयता परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत.
उक्ती आणि प्रत्यक्ष कृतीत फरक– नरेश पुगलिया (काँग्रेस)
लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांनी दाभाडी येथे शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ केली होती. पण भाजप केंद्र व राज्यात सत्तेत आल्यावरही आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. शासकीय मदतीअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. खासदार नुसत्याच घोषणा करतात, पण प्रत्यक्ष कामे होत नाहीत. उक्ती आणि प्रत्यक्ष कृतीत फरक आहे.

‘सिंचन, रस्ते, रेल्वेची कामे पूर्णत्वाकडे’
गेल्या वर्षभरातील काम समाधानकारक आहे. चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्य़ात कोळसा व कापसावर आधारित नवे उद्योग आणण्याचे प्रयत्न मार्गी लागले आहेत. सिंचन, रस्ते व रेल्वेची कामे पूर्णत्वाकडे आहेत. यापुढे केंद्राच्या मोठय़ा शैक्षणिक संस्था आणण्याची योजना असून शेतकरी व स्थानिकांना रोजगार मिळावा, असे उद्योग आणण्यावर भर आहे. खतांचा कारखाना सुरू होणार आहे. येत्या पाच वर्षांचा कृती आराखडा तयार असून मतदारसंघातील विकासकामांना निश्चितच गती देण्याचा प्रयत्न आहे.
रवींद्र जुनारकर