शनिवारी रात्रीपासून घडय़ाळाच्या काटय़ाचे ठाव घेत कधी एकदाची पहाट होते आणि पनवेलच्या काळसेकर तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मतमोजणीच्या ठिकाणी जातो असे पनवेलच्या कार्यकर्त्यांना व उमेदवारांना झाले होते. ही निवडणूक ठाकुरांची प्रतिष्ठा विरुद्ध शेकापचे अस्तित्व अशी असल्याने दोनही बाजूंकडील कार्यकर्त्यांना चुरशीचा अंदाज होता.  लढतीमध्ये अखेर भाजपचे प्रशांत ठाकूर हे विजयी झाले.
काळसेकर महाविद्यालयातील मतमोजणीच्या ठिकाणी सकाळीच जायचे, असल्याने पनवेलच्या दोनही स्पर्धक उमेदवारांची रात्रीची झोप उडाली होती. कार्यकर्त्यांना गुलालापासून ते फटाक्यांपर्यंत दोनही गटांतून आदेश देण्यात आले होते. उमेदवारांची ही स्थिती असल्याने कार्यकर्तेही चलबिचल झाल्याचे दिसत होते. एकदाची रविवारची पहाट झाली. कडक पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवार आणि मोजके २० कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालू नये यासाठी मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर कार्यकर्त्यांना फिरण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे ठाणानाका परिसरात कमळाचे हिरवे-भगवे झेंडे व त्यांच्या नेमक्या विरुद्ध बाजूला शेकापचे लालाबावटय़ाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांचे जथे दिसत होते. सकाळच्या पहिल्या फेरीचे निकाल हे शेकापकडे झुकत होते. मात्र त्यानंतर १८ व्याफेरीपासून भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात फटाक्यांची आतषबाजी झाली. पाहता पाहता भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी पाच हजारांवरून दहा हजारांची आघाडीची मजल मारल्यानंतर शेकाप कार्यकर्त्यांच्या गोटात सन्नाटा पसरला.  अनेकांनी मतांची खात्री करण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र अपेक्षेप्रमाणे निकाल न ऐकू  आल्याने अनेकांचे मोबाइल फोनचे तुकडे कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्पलेक्सच्या रस्त्यावर दिसत होते. २२ व्या फेरीपर्यंत चित्र भाजपच्या प्रशांत ठाकूर यांच्या बाजूने लागल्याने शेकापचे बाळाराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हार पत्करत केंद्र सोडले.३१व्या फेरीअखेर निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी यांनी निकाल जाहीर करताना भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना शेठ म्हणत त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या. अभिनंदनाच्या सरकारी कार्यक्रमानंतर तेथेच आमदार ठाकूर यांनी दुसऱ्या आमदारकीचे पहिले भाषण करून सरकारी यंत्रणेचे आभार मानले.  त्यांच्यासोबत माजी खासदार रामशेठ ठाकूर व त्यांचे निकटवर्तीय असे ५० जण होती. ठाकूर यांनी मतमोजणी केंद्रातून उचलून त्यांची वाजतगाजत विजयाची मिरवणूक काढण्याला सुरुवात झाली.